पुणे : मटार, पालक, गाजर, मुळा, टोमॅटो, बटाटे, कणीस यांसारख्या शाक भाज्यांसह द्राक्ष, डाळींब, संत्रे, खरबूज, कलिंगड आणि सफरचंदासारख्या अनेक फळांची आकर्षक आरास लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली होती. श्री दत्त महाराजांना परिधान केलेला भाज्यांचा सुरेख हार, विविध प्रकारच्या भाज्यांनी सजलेले मंदिरातील खांब, विविधरंगी फळांचे तोरण आणि कळसापासून पायथ्यापर्यंत लावलेला ऊस असे मनोहारी दृश्य भाविकांना पहायला मिळाले. कलिंगडावर कोरलेल्या नक्षीदार मूर्ती मोबाईल कॅमे-यामध्ये टिपण्याचा मोह देखील यावेळी अनेकांना झाला.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरामध्ये ५१ प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करुन आरास साकारण्यात आली. दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे उपस्थित होते. उद्योजक अतुल साखरपे, अनुष्का साखरपे, आर्या साखरपे, ओम साखरपे यांच्या हस्ते सकाळी दत्तयाग पार पडला.
अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता. तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरीता ॠषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर केला, सगळीकडे सुख समृद्धी नांदू लागली. त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते. याची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी आरास करण्यात आली.
मंदिराच्या मुख्य गाभा-यासह कळसापासून पायथ्यापर्यंत ही शंभर भारे ऊसाची आरास करण्यात आली आहे. कलिंगडमध्ये नक्षीकामाने साकारलेल्या श्री दत्त महाराज, श्री शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच भाज्यांची आगळी-वेगळी रांगोळी पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. ही सजावट रविवार चार जानेवारीपर्यंत दिवसभर भाविकांना पाहण्यास खुली राहणार आहे. तरी भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्तमंदिरात फळ आणि भाज्यांची आकर्षक आरास
Date:

