पुणे _
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्मरून पुण्याचे विकासाची शपथ आज भाजपचे उमेदवार घेत आहे. निवडणुकीला सामोरे जाताना जाहीरनामा जनतेसमोर ठेवून भाजप निवडणूक लढवत आहे. भाजपने आत्तापर्यंत 14 जाहीरनामे केलेले असून भाजप एकमेव असा पक्ष आहे जो जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेतो असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
समताभूमी येथे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना वंदन करून पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आला.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर,माजी मंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांचा यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व उमेदवारांना पुण्याच्या प्रगतीची आणि विकासाची शपथ देण्यात आली.
चव्हाण म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत महिला शिक्षणाचा पाया रचला त्यामुळे आज देशातील सर्वोच्च राष्ट्रपती पदावर देखील महिला कार्यरत आहे. समाजाचा विरोध असताना आपले काम अखंडपणे सुरू ठेवण्याची भूमिका सावित्रीबाईंनी ठेवली आणि त्यांना ज्योतिबा यांनी साथ दिली. सावित्रीबाई यांच्या स्मृती लक्षात ठेऊन त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे.
पुरुषप्रधान संस्कृती देशात होती आज त्यात अमुलाग्र बदल होण्यास सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात सर्वाधिक योजना महिलांसाठी आणलेल्या आहे. कुटुंब सक्षम करण्यासाठी महिलांना देखील सक्षम करावे लागेल.
केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक
मोहोळ म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याचा विकास वेगाने होत असून निवडणुकीच्या निमित्ताने तो जनतेसमोर मांडायचा आहे.पुणेकर नेहमी भाजपच्या पाठीशी उभे राहीले आहे. सत्तेत असताना जी विकासकामे केली ती जनतेपर्यंत पोहचवणे आपले काम आहे.विविध विषय निवडणूक काळात मांडले जातील पण आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रित करावे.पुण्याचा वेगाने विकास होण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. आम्हाला सत्तेसाठी निवडून यायचे नाही तर विकास आणि संस्कार रुजवण्यासाठी निवडून यायचे आहे हा संदेश जनतेला द्यायचा आहे.

