परिसंवादातील सूर : ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’
स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : स्त्री चळवळ ही केवळ स्त्रियांची किंवा पुरुषांविरुद्ध चळवळ नसून सर्व शोषितांची, पुरुषसत्ताक विरुद्ध चळवळ आहे. एकमेकांच्या सहकार्याने समन्वयाने चांगला माणूस घडविण्याची ही चळवळ आहे. स्त्रीने बदलताना तिने स्वतःच्या दृष्टिकोनात केलेला बदल हाच महत्त्वाचा भाग आहे. स्त्री चळवळ ही स्त्री आणि पुरुष या दोघांचाही प्रवास आहे. मुस्लिम स्त्री चळवळीसाठी तिचे मुलभूत प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे, असा सूर परिसंवादात उमटला.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ३) ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. अध्यक्षस्थानी होत्या. सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, हिनाकौसर खान, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या अणवेकर, डॉ. अंजली ढमाळ, नमिता कीर हे साहित्यिक सहभागी झाले होते. त्यांच्याशी वैदेही कुलकर्णी यांनी संवाद साधला.
डॉ. गीताली वि. म. म्हणाल्या, ही एकमेव चळवळ अशी आहे की जी घरात आणि घराबाहेरही लढली जाते. स्त्री आणि पुरुष यांच्यातील चांगली मूल्ये एकमेकांनी घेत चांगला माणूस घडू या. ‘सावित्रीबाई घरोघरी, जोतिबाचा शोध जारी’ अशी ही चळवळ हल्लीच्या स्थितीत आहे. स्त्री प्रश्न हा फक्त स्त्रियांचा नाही तर समाजाचा प्रश्न आहे. हे बदल घडवताना व्यक्ती आणि व्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे. आपले मानस बदलणे, आपण विचारी प्राणी असून विचाराने आपली पाटी कोरी करत माणुसकीची वाक्ये उमटविणे आवश्यक आहे. पुरुषांनी जास्त संवेदनशील होणे आवश्यक आहे. चळवळ गुंतागुंतीची आहे. आजची राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती बदलायची असेल, माणुसकी जिंकायची असेल तर या चळवळीला सर्वांची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखीत केले.
नमिता कीर म्हणल्या, राजकारणात स्त्रियांचा खरा प्रवेश आरक्षणातून झाला आहे. हे मोठे परिवर्तन या चळवळीने दिले. पण पूर्वी या स्त्रिया घराबाहेर न पडणाऱ्या असल्याने गोंधळ झाला. पुढे या स्त्रियांना प्रशिक्षण दिले. पण प्रशिक्षित होईपर्यंत स्त्रियांच्या आडून पुरुषच सत्ता करत होते. महिलेला बोलण्याची हिम्मत आली तेव्हा ती धीट झाली आणि मग परिस्थिती बदलू लागले. स्त्रियांकडे पैसे नव्हते तेव्हा बचतगटाने त्यांना आर्थिक स्वावलंबन दिले. आज अर्धी सत्ता मिळवायला स्त्रिया निघाल्या आहेत.
स्त्रीवादी चळवळीचा आढावा घेत डॉ. गायत्री शिरोळे म्हणाल्या, ही वाटचाल तीन टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात अनेक क्रांतिकारी पुढाकार घेतले गेले. आंदोलने, बंड अशा विविध माध्यमातून ही चळवळ पुढे जात होती. काळ बदलला प्रश्न शिथिल झाले; पण संपलेले नव्हते. सामाजिकतेत सौंदर्याची स्तुती खूप पण बौद्धिक स्वातंत्र्यावर सतत अंकुश ठेऊन. सायबर क्राईम, समाज माध्यमे या डिजिटल जगात देखील स्त्री चळवळ ही काळाची गरज होताना दिसते आहे.
डॉ. अंजली ढमाळ म्हणाल्या, १९९४ मध्ये महाराष्ट्राने पहिले महिला धोरण आणले. नंतर हे धोरण विकसित होत गेले. यामुळे अनेक महिला प्रशासनात येऊ शकल्या. महिला अधिकारी म्हणून वावरण्याची संधी यामुळे मिळाली. महिलेला कायम सहाय्यक म्हणून बघितले जात होते; पण प्रमुख म्हणून ओळखले जात नव्हते. सुपर वुमन सिंड्रोम हेतूपुरस्सर डोक्यात घातला गेला आहे. पण आपणच आपला जाच करून घेत आहोत हे समजणे आवश्यक आहे. तुलाही जमू शकते हे तिला स्वतःला, आपल्या सहकाऱ्यांना आणि समाजाला पटवून देणे अशा अनेक आघाड्यांवर महिलांना लढा द्यावा लागतो.
डॉ. सविता मोहिते यांनी सांगितले, स्त्री स्वतःला सिद्ध करायला घराबाहेर पडत असताना तिला घरा सांभाळणेही अनिवार्य असते. बाई आजही सतत सामाजिक दडपणात वावरत असते. स्त्रीदेखील माणूस आहे याविषयी संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम चळवळीने केले. जुन्या शस्त्राने नव्या लढाया लढता येणार नाहीत. काळानुसार बदल आवश्यक आहेत.
सुचिता खल्लाळ म्हणाल्या, स्त्रीयांच्या बाजूने अनेक धोरणे, कायदे आले; पण आजही तेच प्रश्न समोर आहेत. भांडवलशाही जगात बाईचे वस्तुकरण होत आहे का? याचा विचार व्हायला हवा.
मुस्लिम स्त्रिया आणि चळवळ याविषयी हिनाकौसर खान म्हणाल्या, मुस्लिम महिलांसाठी वेगळा कायदा झाला. तोवर चळवळी सर्वसमावेशक असली तरी मुस्लिम महिलांचे प्रश्न वैयक्तिक कायद्यांमध्ये अडकले होते. १९८५ ची घटना व नंतरचे गोध्रा हत्याकांड यामुळे मुस्लिम स्त्री चळवळींना चालना मिळाली. पण पितृसत्ताक व्यवस्थेचे वाहक मौलवी हेच नेते झाल्याने फार मदत होऊ शकली नाही. स्त्रीवादी चळवळ कायमच समन्वयवादी राहिलेली आहे. चळवळ पुढे जाताना भगिनीभाव जपणे आवश्यक आहे. एकमेकांचा आधार म्हणून उभे राहणे आवश्यक आहे.
डॉ. संध्या अणवेकर म्हणाल्या, अबला जी साक्षर नाही, जिला कुटुंब, समाजाचा पाठिंबा नाही तर सबला जी शिक्षित आहे, बाहेर काम करते, स्वतंत्र आहेत आणि प्रबला म्हणजे ज्यांना सर्वच मुबलक मिळाले आहे. कुटुंबातील महिलेची भूमिका बदललेली नाही. आता स्त्री चळवळीला आधुनिक काळात तंत्रज्ञानाशीही लढावे लागणार आहे.
प्रमोद मुनघाटे म्हणाले, आपल्याकडे अनेक संघटना निर्माण झाल्या त्या राजकीय वैचारिकता घेऊन जन्माला आल्या. जात हा घटक आजही स्त्रीवादी चळवळीचा भाग आहे.

