मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणून यांचं कर्तृत्व की त्यांना बिनविरोध निवडून दिलं जातंय? असा थेट सवाल करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर संशयाची छाया टाकली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडी होणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असून, यामागे दबाव, भीती आणि गैरप्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.संजय राऊत म्हणाले, 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? हे कोणत्या विकासकामांच्या, कोणत्या लोकहिताच्या कर्तृत्वावर? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपच्या सत्ताकाळातील कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. बिनविरोध निवडी ही लोकशाहीची हत्या असून, मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
निवडणूक आयोगावरही राऊतांनी सडकून टीका केली. निवडणूक आयोग म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा लोकशाहीवरील विश्वास उडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
देशातील आणि जगातील लोकशाही इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची उदाहरणे नसल्याचे सांगत राऊत यांनी याला लोकशाहीसाठी धोकादायक प्रवृत्ती ठरवले. अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील, राम मनोहर लोहिया किंवा आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. मग महाराष्ट्रात एवढे लोक कोणत्या कर्तृत्वावर बिनविरोध निवडून येत आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात बिनविरोध निवडींसाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या सगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. समोरच्या उमेदवारांवर दबाव टाकणे, धमक्या देणे आणि प्रचंड आर्थिक आमिष दाखवणे हा एक नवीन राजकीय ट्रेंड तयार झाला आहे. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात इतक्या संख्येने बिनविरोध निवडी कधी झाल्या नव्हत्या. हे आकडे पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सामान्य जनतेला देखील हादरवणारे आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात लोकशाही प्रक्रिया जाणीवपूर्वक मोडीत काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बिनविरोध माघारीसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांच्या खेळावर बोलताना राऊतांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी पाच-पाच कोटी रुपयांच्या ऑफर दिल्या गेल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना माघार घेण्यासाठी देण्यात आलेला आकडा पाहून डोळ्याची बुबुळ बाहेर पडेल, असे राऊत म्हणाले. जळगावमध्ये तर उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून घराघरांत कोट्यवधी रुपयांच्या बॅगा पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला. इतका प्रचंड पैशांचा खेळ या देशाच्या लोकशाहीत कधीच झाला नव्हता, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
बिनविरोध निवडीसाठी निवडणूक यंत्रणेचाच गैरवापर
निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवरही संजय राऊत यांनी कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, बिनविरोध निवडीसाठी निवडणूक यंत्रणेचाच गैरवापर करण्यात आला. माघारीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ असतानाही, त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तीन वाजल्यानंतरही अर्ज घ्या आणि तीन वाजण्याआधीची वेळ दाखवा, अशा स्पष्ट सूचना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, असा दावा राऊत यांनी केला. या सगळ्या प्रकरणात कोणकोणाचे फोन आले, कोणत्या मंत्र्यांचे आणि कोणत्या कार्यालयातून दबाव टाकला गेला, याची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. जर 60-60 उमेदवार बिनविरोध होत असतील, तर ही निवडणूक कसली? मग मतदारांनी करायचं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एखाद्या भागातील उमेदवार दबावाखाली किंवा पैशांसाठी माघार घेत असतील, तर त्या भागातील मतदारांचे हक्क हिरावले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाला या सगळ्याचं काहीच वाटत नाही का, असा सवाल करत त्यांनी आयोगावरही टीकेची झोड उठवली.
निवडणूक आयोग हा भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत संजय राऊत म्हणाले की, आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं बनत चालला आहे. निवडणूक आयोग हा भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. हे पाळीव मांजर बनलं आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. लोकशाही टिकवायची असेल तर या बिनविरोध निवडींची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रात निवडणुकांचा अर्थच उरणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
अजित पवारांनी शरद पवारांसोबत परत यावे
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले, हा आरोप आम्ही केलेला नाही, असं स्पष्ट करत त्यांनी भाजपवरच अप्रत्यक्ष बोट दाखवलं. सत्तेसाठी सगळे आरोप विसरून एकत्र बसणं हे राजकीय ढोंग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आज अजित पवार भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मग त्यांनी अमित शहांनी दिलेला पक्ष सोडून मुळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत यावे, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला.

