सावित्री बाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. यानिमित्ताने मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे याची विविध स्तरावर जनजागृती केली जाते
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त थोडं पण कामाचं: आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आज जयंती: सावित्रीबाईची ओळख महाराष्ट्राला समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची पत्नी अशी असली तरीही त्या कवियित्री, समाजसुधारक आणि भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या.महाराष्ट्रात राज्य सरकारने आता दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी हा दिवस ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रात सातारा येथील नायगाव मध्ये झाला. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू केली. केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांना देखील छेद देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली
काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई..
नाहीतर आम्हाला स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..
तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच राहिलो असतो.. खिडकीतून दिसणार्या टीचभर आभाळात नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..
तू खाल्ल्या शिव्या-शाप म्हणून आम्ही आज ‘आशीर्वाद’ जगतो आहोत.. तुझ्या अंगावर फेकले होते शेण, दगड आणि माती पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत..
तुझा लढा आमच्यासाठीचा.. काल इतिहास सांगून गेला..
आज वर्तमानात तुझ्या लेकी माई.. भविष्य घडवत आहेत!!
तुझ्या आजन्म ऋणी.. तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तविनम्र अभिवादन

