भाजप ही लुटारुंची टोळी – अजित पवारांचे वक्तव्य
अजित पवार भाजपवर निशाणा साधताना म्हणाले होते, भाजप ही लुटारुंची टोळी झाली आहे. आमच्या सत्ताकाळात पिंपरी – चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. पण मोदी लाटेत अनेक सहकारी भाजपमध्ये जाऊन बसले. अर्ज भरलेल्या उमेदवारांचा पाठलाग केला गेला. काही लोकांना गाडीत बसून धमकावण्यात आले. सध्या इथे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मागील 7 वर्षांत महापालिका अक्षरशः लुटून खाण्यात आली आहे. हे रोखण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले होते.
पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा इशारा दिला. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणालेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांना मनभेद किंवा मतभेद निर्माण होतील असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे.पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला आहे. अजित पवारांनी शुक्रवारी या प्रकरणी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपने मागच्या 7 वर्षांत महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली. या लुटारुंना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलोत, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही तर ज्या लोकांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सर्वांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या विधानाचा आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समाचार घेतला.
रवींद्र चव्हाण म्हणाले, अजित पवारांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. प्रत्यक्षात आरोप – प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. त्यामुळे त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. पुण्याची निवडणूक ही पुणेकरांच्या नागरी समस्या सोडवण्याच्या मुद्यावर होत आहे. पुणेकरांना चांगल्या सुविधा कोण देऊ शकते यावर ही निवडणूक होत आहे. त्यांना या सुविधा भाजपच देऊ शकते.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील महायुती सरकार हे गतिमान सरकार नेमके कसे असावे याचे उत्कृष्ट उदाहरण घालून देत आहे. पुणेकरांना याची प्रचिती येत आहे. कारण, पुण्यातही हे सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. पायाभूत प्रकल्पांची कामे वेगाने केली जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. पुणे महापालिकेच्या स्थापनेपासूनचे स्वप्न साकार करायचे असेल तर त्या दिशेने पाऊले उचलणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव झाला होता.
पण राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही. त्यांना ती करायचीच नव्हती. त्यांनी काहीच केले नाही. याऊलट केंद्रात मोदींचे सरकार आल्यानंतर पुण्यात मेट्रो सुरू झाली. सध्या शहरात 33 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार झाले आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
दुसरीकडे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढवताना मनभेद किंवा मतभेद होणार नाहीत याची काळजी तिन्ही पक्षांनी घ्यावी असे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी ठरवले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्याही नेत्यावर अद्याप टीका केली नाही. पण अजित पवार असे का बोलले हे मला माहिती नाही. त्यांनी तसे बोलायला नको होते. माझी सर्वांना विनंती आहे की, कुणीही मित्रपक्षांमध्ये मनभेद, मतभेद निर्माण होतील असे बोलू नये.

