पुणे :महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आता पुणे शहरातील श्रीमंत उमेदवारांची यादी पुढे आली आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. भाजपच्या विविध प्रभागातील उपनगरातील अनेक उमेदवार या यादीत अग्रेसर आहेत. सुरेंद्र पठारे, सायली वांजळे, चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यासारखे बड्या नावांचा समावेश आहे.
प्रत्येक उमेदवाराला त्याचा अर्ज भरण्यावेळी प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं. या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराला त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता, वाहनं, सोने चांदी, तसेच इतर सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत. या यादी मध्ये माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे.
सुरेंद्र पठारे, आमदार बापू पठारे यांचे पुत्र
पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी “फिक्स” झाली. सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पठारे यांच्याकडे एकूण २७१ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
पठारे यांच्या भाजप प्रवेशासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे सुद्धा महापालिका निवडणुकीचा रिंगणात उतरल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदाच नशीब आजमावून पाहणारे पठारे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.टेक ची पदवी मिळविली आहे. पठारे यांच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा क्रिस्टा अशी अनेक वाहने आहेत. सायली वांजळे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांची नावावर असणारी मालमत्ता समोर आली आहे. वांजळे यांच्याकडे ७७ कोटी ६५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या विशेषतः अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या सायली वांजळे यांनी मुंबईत झालेल्या मेगा प्रवेशावेळी हाती कमळ घेतलं. पुण्यातील वारजे भागातून सायली वांजळे या आधी नगरसेविका राहिलेल्या आहेत.
पृथ्वीराज सुतार, माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र
माजी मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते शशिकांत सुतार यांचे सुपुत्र पृथ्वीराज सुतार यांनी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला. महापालिकेची निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ४२ कोटी ५१ लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे. बुलेट, इनोव्हा, निसान मायक्रा सारख्या वाहनांची नोंदणी सुद्धा त्यांच्या नावावर असल्याची माहिती आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे दिवंगत नेते विनायक निम्हण यांचे सुपुत्र चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत औंध बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवत आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सनी निम्हण हे इच्छुक होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावावर ३६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ऑस्ट्रेलियामधून पदवी प्राप्त केलेल्या निम्हण यांच्याकडे १ इनोव्हा, ५ दुचाकी आणि १ बुलेट अशी वाहनं त्यांच्याकडे असून प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे २५ तोळे सोनं आहे.
स्वरदा बापट
एलएलएम ची पदवी प्राप्त केलेल्या स्वरदा बापट या पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 25 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी त्यांच्यावर निश्चित करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरला आहे. पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढत असल्या तरी सुद्धा त्यांनी यापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक लढवली आहे. त्यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता 11 कोटी 22 लाख रुपयांची असून त्यांच्याकडे एक दुचाकी, आणि 23 लाखांची क्रेटा गाडी आहे. याशिवाय स्वरदा बापट यांच्याकडे 13 तोळे सोने आहे.

