पुणे-पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दोन अधिकृत उमेदवार श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आले आहेत. या निकालानंतर पुण्याचा कौल काय असेल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटले आहे.संबंधित प्रभागात विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे हे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक ३५, सनसिटी माणिकबाग परिसरातून मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांच्या या विजयामुळे पुणेकरांच्या मनात आनंद आणि उत्साह द्विगुणित झाल्याचे घाटे यांनी सांगितले.
या बिनविरोध विजयी उमेदवारांचा सत्कार भाजप शहर कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दीपक नागपुरे, रवींद्र साळेगावकर, विकास दांगट, अमोल कविटकर उपस्थित होते.
पुणे भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ ३ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता समता भूमी येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार, आमदार आणि खासदार उपस्थित राहतील, अशी माहिती धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बिनविरोध विजयी झालेल्या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पुणेकरांचे आभार मानले. पुणेकरांनी या निवडणुकीत भाजपवर विश्वास दाखवला असून, पुण्याचा महापौर भाजपचाच होईल याची मुहूर्तमेढ आज रोवली गेली आहे, असे मोहोळ म्हणाले.
उर्वरित १६३ जागांवरही भाजप चांगले यश संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेचा कौल आणि भाजपवरील लोकांचा विश्वास लक्षात घेऊनच उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांनी संबंधित प्रभागात माघार घेतली. भाजपप्रती जनभावना विरोधकांच्या लक्षात आल्याने, तसेच निवडणुकीत पराभव आणि अनामत रक्कम जप्त होण्याची भीती असल्याने त्यांनी माघार घेतल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
माणिकबाग परिसरातील दोन्ही नगरसेवक यापूर्वीही नगरसेवक म्हणून काम करत होते आणि नागरिकांनी त्यांच्या कामाची पावती दिली आहे. पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांची नावे होती आणि ते दोघेही अनुभवी नगरसेवक आहेत. देशभरात भाजपच्या बाजूने जनभावना असल्याचे यातून दिसून येते, असेही मोहोळ यांनी नमूद केले.
शिवसेनेसोबतच्या मैत्रीपूर्ण लढतीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर मनपा निवडणुकीत युती करावी याबाबत अनेकवेळा चर्चा झाली होती. मात्र, जागावाटपावरून शिवसेनेसोबत मतभेद झाल्याने आणि दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत देत आहेत. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर लोक आमच्यासोबत येत असल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

