पुणे –
भारतीय जनता पक्षावरील नागरिकांचा विश्वास पाहून विरोधकांनाही आता वस्तुस्थिती कळून चुकली आहे. भाजपच्या पाठीशी असलेल्या जनभावना आणि आपली अनामत रक्कमही जप्त होईल, अशी भीती वाटत असल्यानेच विरोधक निवडणुकीतून माघार घेत आहेत. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या विजयाची घौडदौड सुरू झाली आहे,’असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी व्यक्त केला. महापौर भाजपचाच असेल आणि शिवसेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सनसिटी माणिकबाग या प्रभागातील (प्रभाग ३५) मंजुषा दीपक नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे शुक्रवारी बिनविरोध निवडून आले. यानिमित्त शहर भाजपतर्फे मोहोळ यांच्या हस्ते शहर कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, दीपक नागपुरे, रवींद्र साळेगावकर, विकास दांगट आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. त्यामुळे पुणेकरांचा भाजपवरील विश्वास आणखी दृढ होत आहे. पुणेकरांचा हा विश्वास पाहून विरोधकांना वस्तुस्थितीची जाणीव होत असून सक्षम उमेदवार नसल्यानेच ते माघार घेऊ लागले आहेत. सर्वत्र फिरून गोळा केलेले उमेदवार भाजपच्या उमेदवारांसमोर टिकू शकणार नाहीत हे देखील त्यांना समजले आहे. बिनविरोध निवडून आलेले दोन्ही नगरसेवक तिसऱ्यांदा पालिकेत येणार असून त्यांच्या अनुभवातून ते या परिसराचा,शहराचा चांगला विकास करतील, असे मोहोळ म्हणाले.
शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढतपालिका निवडणुकीसाठी आम्ही सातत्याने शिवसेनेसोबत युतीची भूमिका मांडत होतो. अनेकवेळा चर्चाही झाली. मात्र, काही जागांवर एकमत न झाल्याने शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर लोक आमच्यासोबत आहेत. राज्यात महायुती म्हणून आम्ही काम करत आहे मात्र, पुण्यात मनपा निवडणुकीत आम्ही शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत देऊ.
- समताभूमीला वंदन करून प्रचाराचा शुभारंभ
मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप हे भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे पुण्याचा कौल काय असणार हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही. मी त्यांचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील प्रचाराचा शुभारंभ आज (शनिवार तीन जानेवारी) सकाळी आठ वाजता समता भूमी येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून होईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार,आमदार, सर्व उमेदवार उपस्थित राहतील, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
- अदिती बाबर भाजप पुरस्कृत उमेदवार प्रभाग क्रमांक दोनमधील भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी माघार घेतल्यानंतर अदिती बाबर या भाजपच्या अधिकृत पुरस्कृत उमेदवार असतील, त्यांना शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पाठिंबा पत्र देण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राहुल जाधव, रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे हे प्रभाग दोन मधील भाजपचे इतर उमेदवार आहेत.

