शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे, -‘राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील,असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमताने राज्यातील महापालिका निवडणुका युती म्हणून लढवायचे ठरवले आहे. त्यानुसार पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली. ही प्राथमिक चर्चा होती. त्यात निश्चित काही प्रभाग, आकडे आणि जागांबाबततही चर्चा झाली. मात्र, यापुढेही आमच्या काही बैठका होतील, त्यात याला अंतिम स्वरूप दिले जाईल,’असे मोहोळ म्हणाले. ‘दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळणे अवघड आहे. इच्छुक असण्यातही काही गैर नाही. आम्ही एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे कुठेही बंडखोरी होईल, अशी शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही इच्छुकांकडून अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या. त्यापुढील निर्णय कोअर कमिटी आणि पक्ष नेतृत्व घेईल,’असेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाही (आठवले) मच्यासोबत आहे. काही दिवसांपूर्वीच माझी व मा. रामदासजी आठवलेंची दिल्लीत भेट झाली. लवकरच आरपीआय व आमची बैठक होईल. आमची युतीही कायम राहील,’असेही मोहोळ म्हणाले.
‘निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर पक्षातून इच्छुक असलेल्यांपैकी कोणाला घ्यायचे कोणाला नाही, हा पक्षाचा निर्णय आहे. तूर्तास तरी कोणाचाही प्रवेश होणार नाही. पक्षात प्रवेश दिल्यानंतर तो भाजपचा कार्यकर्ता होतो. पण उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमताही पडताळली जाते. पक्ष नेतृत्व घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल.,’असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.


