भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी करा: हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई, दि. १८ डिसेंबर २०२५
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होत असून काँग्रेस पक्षात इनकमिंग जोरात सुरु आहे. आज मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार आणि स्थानिक राजकारणातील प्रभावशाली नेते गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचे सुपुत्र वेंचर मेंडोसा व तारेन मेंडोसा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपा व इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत केले व मिरा भाईंदर मध्ये आता नवे पर्व सुरु झाले, असे म्हटले आहे.
मिरा भाईंदरमध्ये पक्ष प्रवेश व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात मागील तीन साडेतीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका होत आहेत या दरम्यानच्या काळात महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, जनतेच्या पैशाची लुट केली, ५० खोके, एकदम ओके, चा खेळ सुरु होता. सत्ताधारी पक्षातील लोकांना भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडू लागला म्हणून ते आता ड्रग्जच्या माध्यमातून तरुणपिढीला नासवण्याचे काम करत आहेत.
सपकाळ पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील शेतात ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने कारवाई करून उघड केला. या कारखान्यात बंगाली बोलणारे कामगार काम करत होते, जवळपास ४३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यात हस्तक्षेप करून पकडलेल्या ४० लोकांना सोडण्यास सांगितले.
दुसरीकडे एक व्यक्ती भाईयों और बहनों…म्हणून मागील ११ वर्षापासून लोकांना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस जाती धर्मांमध्ये द्वेष पसरवून सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. सत्ताधारी पक्षातील मंत्री व त्यांचे नातेवाईक भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत, मिल बाट के खाओ कारभार सुरु आहे. या सर्वांना धडा शिकवा आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी करा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
यावेळी बोलताना माजी आमदार मुजफ्फर हुसेन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाची लोकशाही व राज्यघटना वाचवण्याची लढाई सुरु आहे. वोटचोरी करून भाजपा निवणुका जिंकत आहे. निवडणुक आयोगाकडे मतदार यादीतील अनेक घोटाळ्यांची तक्रार केली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काँग्रेसने सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. भाजपा महायुती सरकारने मिरा भाईंदरला २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मेट्रो सुरु होणार होती पण अद्याप काहीच काम झालेले नाही. आगामी काळात काँग्रेसच्या माध्यमातून या भागात विकास कामे करु, असे मुजफ्फर हुसेन म्हणाले..


