पुणे, दि. १८: पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या देश-विदेशात मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून यास्पर्धेच्या माध्यमातून देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविणार आहे; त्यामुळे संपूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने कामे करतांना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे, सायकलपट्टूना कोणताही त्रास होणार नाही, यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने समन्वयानी कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे शहरचे वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, पिंपरी-चिंचवड शहरचे वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे उपधीक्षक दिलीप शिंदे, पुणे ग्रँड चॅलेज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेज टूर स्पर्धेच्या रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार करावी. यामध्ये दिशादर्शक फलके, मार्गाच्या दोन्ही बाजुच्या पट्टीची रंगरगोटीची कामे गतीने पूर्ण करावीत. स्पर्धेचे महत्व लक्षात घेता रस्त्याचे सौंदर्यीकरणाची कामे करावीत. रस्त्यांच्या बाजुला अतिक्रमण असल्यास पोलीस विभागाच्यामदतीने काढून घ्यावीत. स्पर्धेच्या ब्रँडिग मोठ्या प्रमाणात करावे, याकरिता पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बसस्थानक, मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळ आदी सर्व संबंधितांनी जाहिरात फलके उपलब्ध करुन द्यावीत.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रस्त्यांची तपासणी करुन वाहतूक नियोजन व गर्दीचे व्यवस्थापनाबाबत सुक्ष्म नियोजन करावे. ग्रामीण भागात पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत: प्रत्यक्ष सायकलीद्वारे सुरक्षिततेच्यादृष्टीने सायकल रस्त्याची पाहणी करावी. पोलीस विभागाने स्पर्धेकरिता आवश्यक मनुष्यबळ, वाहने, बॅरिकेटिंगची व्यवस्था करावी. नियुक्त मनुष्यबळाचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करुन रंगीत तालिम पूर्ण करावी, असेही श्री. डुडी म्हणाले.
यावेळी सर्व संबंधित विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने माहिती दिली.



