मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम म्हणाले, ज्या 77 उर्वरित जागा आहेत, त्या उर्वरित जागांची चर्चा आमची सुरू आहे. एकमेकांना आकडेवारी देणे, ही सगळी प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पार पडेल आणि मग आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यानंतर याची जी काही घोषणा असेल ती होईल.
अमित साटम यांना जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जागावाटपाचा फॉर्म्युला आहे आहे की या मुंबईच्या महानगपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन द्यायचे आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाइं ही महायुती कटिबद्ध आहे. त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचे नाही. 227 जागांवर महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महापालिकेमध्ये विराजमान होईल. जेणेकरून येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन देणे, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवणे आणि काही लोक मतांच्या लांगूलचालनासाठी या मुंबईचा रंग बदलण्याचे काम करत आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यावर आमचे एकमत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्याकडे देण्याचे ठरवले आहे.
पुढे बोलताना अमित साटम म्हणाले, आमचे सूत्र हेच आहे की मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करणे. ज्या लोकांनी 25 वर्ष बसून मुंबई महापालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली आणि आता स्वतःचे संपलेले राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी, मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडणे हे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी महायुती यांना परास्त करण्यासाठी सज्ज आहे.
शिवसेना शिंदे गट किती जागा लढणार आणि भाजप किती जागा लढणार? या प्रश्नावर उत्तर देताना अमित साटम म्हणाले, 150 जागा ही महायुती लढणार आहे. भाजप, शिवसेना आणि रिपाइं महायुती 227 जागा लढणार आहे. त्यात 150 जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित 77 जागांवर आमची चर्चा सुरू असून लवकरच पुढील 2-4 दिवसात या जागा घोषित होतील. तसेच आमच्यासाठी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे महत्त्वाचे नाही. महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचे आहे.
मुंबई महापालिकेच्या चर्चेत एकदाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव घेतले नाही, यावर अमित साटम म्हणाले, नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत आमचे देणे-घेणे नाही. नवाब मलिक यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांमधून जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही. तसेच राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती करण्यास इच्छुक नाही. तसेच उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून दुसऱ्या कुठल्या नेत्यावर जबाबदारी सोपवली तर त्याचे आम्ही स्वागत करू.
शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी यावेळी म्हटले की, त्यांची आणि आमची भूमिका एकच आहे. 150 जागांवर आमचे एकमत झाले आहे आणि उर्वरित जागांवर आम्ही चर्चा करणार आहोत. तसेच कुठल्याही परिस्थितीत 150 जागांच्या वर जागा आम्ही जिंकणार. ज्यावेळी उमेदवार जाहीर होतील तेव्हा अनेक प्रश्नांचे उत्तर मिळतील. आज आमची जी काही बैठक झाली, त्यात आम्ही काशापद्धतीने निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या जागांवर आमचे एकमत झाले आहे त्यावर आमची चर्चा झाली.



