पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे . पिंपरी भागात एका सदनिकेवर छापा टाकून तेथून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांच्या पथकाने पुणे, पिंपरीसह मुंबई, गोव्यात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडीसह वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे.
तुषार चेतन वर्मा (वय २१, सध्या रा. शितळादेवीनगर, सूस, मूळ रा. दिल्ली), सुमीत संतोष डेडवाल (वय २५, सध्या रा. मधुबन कॉलनी, सांगवी, मूळ रा. शिक्षक कॉलनी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), अक्षय सुखलाल महेर (वय २५, सध्या रा. एक्सर्बिया टाऊनशिप, हिंजवडी, मूळ रा प्रगती कॉलनी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), मलय राजेश डेलीवाला (वय २८, रा. अमृतनगर, घाटकोपर, मुंबई), स्वराज अनंत भोसले (वय २८, रा. खोत चाळ, कुर्ला, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात अमली पदार्थांची तस्करी, तसेच महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराइतांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीचा वापर न करता पाणी आणि पोषक द्रव्ये यांच्या साह्याने बंदिस्त जागेत, नियंत्रित वातावरणात लागवड केलेला गांजा. सध्या हायड्रोपोनिक गांजाचे परदेशातून तस्करीचे प्रकार वाढले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपी तुषार वर्मा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरात सापळा लावून त्याला पकडले. वर्माची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचे साथीदार सुमीत डेडवाल, अक्षय महेर हे पिंपरी भागात वास्तव्यास असून, तेथे त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतल्याची माहिती तपासात मिळाली. वर्मा, डेडवाल, महेर यांनी सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागडव केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिसांच्या पथकाने पिंपरीत छापा टाकला. तेथून हायड्रापोनिक गांजा, तसेच अन्य साहित्य जप्त केले.
याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खात्यातील सात लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीचे आंतराष्ट्रीय जाळे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आ त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून दोन कोटी २९ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा नुकताच जप्त करण्यात आला. तसेच, एका महिला प्रवाशाने वेफर्सच्या डब्यात गांजा लपवून आणल्याचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने उघडकीस आणला. उत्तर प्रदेशात विमानाने निघालेल्या माहिती तंत्रज्ञान कंपनीतील एका तरुणाकडे गांजाच्या पुड्या सापडल्या. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून उच्चभ्रू वर्गात हायड्रोपोनिक गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण गायकवाड, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस कर्मचारी भोरे, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, जाधव, दिनेश भारकड, उपनिरीक्षक वैभव पाटील, विराज शिंदे (सहारा पोलीस ठाणे, मुंबई) यांनी ही कारवाई केली

