भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीका
मुंबई-उबाठा गट आणि मनसे या दोन अंतीम टप्प्यात असलेल्या पक्षांचे जागावाटप अंतीम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खा. संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न असून ज्या मनसेवर शिवीगाळ करत जहरी टीका केली होती त्यांच्याच शिवतीर्थाचे उंबरठे उद्धव ठाकरेंना झिजवावे लागणे हा नियतीचा खेळ आहे असा हल्लाबोलही श्री. बन यांनी केला.
मुंबई ही कोणाची खासगी जहागीर नाही
मुंबई सर्वसामान्य नागरिकांची आहे. ज्या उबाठा गटाने खासगी जहागीर असल्याप्रमाणे मुंबईला ओरबाडले त्यांना ‘मुंबई आमचीच’ असे म्हणताना लाज वाटायला हवी असा प्रहार श्री. बन यांनी केला. मुंबई हे आमचे घर म्हणता पण कुठलेही घर हे नुसत्या चार भिंतींवर उभे रहात नसते तर विचारांवर उभे असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी शिवसेना बांधली होती त्यांचे विचार पायदळी तुडवत उबाठा गटाने सत्तेसाठी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करून घराची भाषा करणे राऊतांना शोभत नाही अशी टीका त्यांनी केली.
फेसबुक लाइव्हवर चालणारे उबाठा सरकार टेस्ट ट्यूब बेबी होते. महायुती सरकारला टेस्ट ट्यूब बेबी संबोधत टीका करणा-या राऊतांना लक्ष्य करत हे सरकार जनतेच्या आशीर्वादातून निर्माण झालेले सरकार आहे, दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेले हे जनतेचे लाडके सरकार आहे असे श्री. बन यांनी सुनावले. घरातून फेसबुक लाइव्हवर चालणारे उबाठा सरकार टेस्ट ट्यूब बेबी होते. 90 जागा लढून 20 जागा जिंकलेल्यांनी खरे बेबी कोण हे ओळखावे असा टोमणाही श्री. बन यांनी लगावला.
शिवतीर्थावर उबाठा गटाचा अधिकार नाही
शिवतीर्थ सार्वजनिक वारसा आहे. या शिवतीर्थावर दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभा झाल्या होत्या.‘शिवतीर्थ आमचेच’ असा दावा करू नका, ज्या दिवशी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा आणि राऊतांनी अफझलखानाची वंशावळ पुढे नेण्याचे काम केले त्याचवेळी शिवतीर्थाचाही अधिकार गमावला अशी सणसणीत टीका श्री. बन यांनी केली.
खरा हरामखोर हा उबाठा गट
निवडणूक आयोगाबद्दल हरामखोर शब्द वापरून लोकशाहीचा अपमान राऊतांनी केला आहे. 2019 ला भाजपा सोबत युतीमध्ये निवडणूक लढून सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसणा-या उबाठा गटाला हरामखोर हा शब्द चपखल बसतो. सत्तेसाठी काँग्रेसकडे गेले, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता का असा सवालही श्री. बन यांनी केला.
काँग्रेसमधील गळतीला कारणीभूत राहुल गांधी आणि सपकाळ…
राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असल्याने काँग्रेस आमदार भाजपामध्ये येण्याची लाट सुरू झाली आहे. पक्षात येणाऱ्यांचे भाजपा मध्ये नेहमीच स्वागत केले जाते असेही श्री. बन म्हणाले.

