पुणे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या मालकीच्या जागेत १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलामात्र साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरीत गावातील एका रिसॉर्टमध्ये टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप होत आहे. अशातच प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.पार्थ पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सह आता एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घ्यायलाच पाहिजे , मागितलाच पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
१३ डिसेंबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात शनिवारी सकाळी छापा घालून मेफेड्रॉन अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत एकूण सुमारे ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत विशाल मोरे या व्यक्तीसह त्याच्या सहा साथिदारांना अटक करण्यात आली. ९ डिसेंबर रोजी मुलुंडमध्ये दोघांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते. या दोघांच्या चौकशीतून विशाल मोरे आणि अन्य आरोपींची नावे पुढे आली. त्यानंतर सावरी गावातील ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची, नातेवाईंकांची असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र पोलिसांकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी ही जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाची असल्याचा गौप्यस्फोट केला.
“रिसॉर्टजवळ असलेल्या शेडसाठी पक्का रस्ता तयार करण्यात आला होता. याची मागणी कुणी केली हा प्रश्न आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या शेडमध्ये तीन लोक राहत होते. हे शेड गोविंद नावाच्या व्यक्तीचे आहे. हे शेड ओंकार डिगेने चालवायला घेतलं होतं. त्या तिघांसाठी जेवण रिसॉर्टमधून जात होते. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांचे आहे. साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकांनी प्रकाश शिंदेंचा एकनाथ शिंदेंसोबत संबंध नसल्याचे सांगितले. सातबाऱ्याचा शोध घेतला असता त्यामध्ये सुभाष आणि प्रकाश शिंदे नाव सापडले. एकनाथ शिंदे यांच्या भावांची नावेही योगायोगाने तीच आहेत. रिसॉर्टचे नाव देखील तेजयश असं आहे. त्या गावातील एका बॅनरवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचा फोटो होतो. हे हॉटेल रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं आणि तो दरे गावचा सरपंच आहे,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“या प्रकरणात प्रकाश शिंदे यांचे नाव का लपवण्यात आलं हा माझा प्रश्न आहे. तो एकनाथ शिंदे यांचा भाऊ नसेल तर तो कोण आहे हे सांगा. शेडमधील लोक काय काम करतात हे प्रकाश शिंदे यांना माहिती नव्हतं का, ते माहिती असूनही ते त्यांना जेवण देत राहिले,” असा आरोप अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी दावा केला की, छाप्यात ४५ किलो ड्रग्स सापडले असून ते प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्टजवळील पत्र्याच्या शेडमध्ये साठवले होते. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असून, त्यांनी २०१७ मध्ये ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. रिसॉर्टचे नाव ‘हॉटेल तेजयश’ असून, ते प्रकाश शिंदे यांच्या मुलांच्या नावाने आहे. तेथे सात-आठ रूम बांधल्या असून, स्विमिंग टँकसह इतर सुविधा आहेत.
अंधारे यांनी सांगितले की, शेडचा मालक गोविंद सिंदकर आहे. त्याने ओंकार दिघे याला शेडची चावी दिली होती. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तेथे राहणाऱ्या तीन व्यक्तींना जेवण प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून येत होते. या तीन जणांची नावे एफआयआरमध्ये का नाहीत? एफआयआर ऑनलाइन का दिसत नाही? सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माहिती लपवली असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, एखाद्या प्रकरणात पोराचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जातो, तर ड्रग्स प्रकरणात भावाचे नाव आले तर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. हे प्रकरण उघडकीस आणल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरक्षा मागितली.
काय आहे प्रकरण?
मुंबई क्राइम ब्रांचने १३ डिसेंबर रोजी सावरी गावातील एका शेडमध्ये छापा टाकला. यात ७.५ किलो घन एमडी, ३८ किलो द्रव एमडी आणि कच्चा माल जप्त करून एकूण ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तीन कामगारांना अटक करण्यात आली. हे प्रकरण पुण्यातील विशाल मोरे याच्या अटकेपासून उघडकीस आले.
कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही आरोप केले की, जेवण प्रकाश शिंदे यांच्या ‘तेजस हॉटेल’मधून येत होते. ओंकार दिघे याने प्रकाश शिंदे यांच्या कामासाठी जागा मागितली होती. मात्र प्रकाश शिंदे यांचे रिसॉर्ट किंवा थेट मालकी असल्याचे अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत. हे प्रकरण राजकीय वादाचे रूप घेत असून, महायुती सरकारवर माहिती दडपण्याचा आरोप होत आहे

