मुंबई-राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला आहे. याच प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, आता पक्षप्रमुख अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई संदर्भात अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच याविषयी मी काहीही बोलू शकतो. आज रात्री मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर अजित पवार आणि माझी बैठक होणार आहे. त्यानंतर पक्षांतर्गत जे निर्णय असतील ते घेतले जातील, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

