सातारा/पुणे : सातारा येथे एक जानेवारीपासून सुरू होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास संमेलनगीत तयार करण्यात आले आहे. या गीताचे प्रकाशन पुणे येथे शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात गीताचे प्रकाशन प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होत असून कार्यवाह सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
यंदाचे साहित्य संमेलन शतकपूर्व असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीवर होणारे हे पहिलेच संमेलन आहे. सातारा या स्वराज्याच्या राजधानीत ते होत असल्याचे औचित्य साधून संमेलनाचे खास गीत तयार करण्याची संकल्पना संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मांडली. त्यातूनच संमेलनगीताची निर्मिती करण्यात आली.
सातारचे सुपुत्र, पत्रकार, लेखक आणि रंगकर्मी राजीव मुळ्ये यांनी या गीताचे लेखन केले असून सातारा येथील सुनील जाधव यांचे संगीत दिग्दर्शन आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. ते राज्यातील आघाडीचे संगीतकार आणि की-बोर्डवादक असून, दिग्गज कलावंतांसमवेत त्यांनी मैफली रंगविल्या आहेत.
विनल देशमुख आणि राजेश्वरी पवार या प्रसिद्ध पार्श्वगायकांच्या आवाजात हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. देशविदेशात कार्यक्रम करणारे विनल देशमुख हे स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार’चे विजेते आणि ‘झी-सारेगमप हिंदी’चे उपविजेते आहेत. राजेश्वरी पवार यांनी आठ वर्षे संगीतकार बप्पी लहरी यांच्यासोबत सादरीकरण केले आहे. दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड, बालगंधर्व रत्न अवॉर्ड यांसह अनेक नामवंत पुरस्कार राजेश्वरी पवार यांनी पटकावले आहेत. भरतनाट्यम् नृत्यप्रकारातही त्या पारंगत आहेत.
संमेलनगीत प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन यांनी केले आहे.

