पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची ४० एकर सरकारी जमीन ३०० कोटीत विकण्यात आली. जमीन विकणारी शीतल तेजवानी तसेच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना अटक केली आहे. तारूंमुळे व्यवहारात शासनाचा २१ कोटींचा महसूल बुडाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
तेजवानी व कंपनीचा संचालक, पार्थ यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी सहदुय्यम उपनिबंधक रवींद्र तारूशी संगनमत केले. जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमाणपत्र न घेता मुद्रांक शुल्कात माफी दिल्याचे भासवून जमीन विक्रीची दस्त नोंदणी केली. आरोपींनी २१ कोटींचे मुद्रांक शुल्क बुडवून आर्थिक फायदा घेतला. या रकमेसह आरोपींच्या आर्थिक हितसंबंधांच्या तपाससाठी तेजवानी आणि तारू यांची एकत्रित चौकशी करायची असल्याचे बावधन पोलिसांनी न्यायालयात पोलिस कोठडी मागितली. ती मान्य झाली..
तेजवानीने बनावट कागदपत्रे तयार करणे आणि बेकायदा व्यवहारांसाठी डिजिटल उपकरणांचा वापर केल्याची दाट शक्यता आहे. मुद्रांक शुल्क माफीसाठी तिने आणि दिग्विजय पाटीलने उद्योग विभागाकडे इरादा पत्रासाठी अर्ज केला. त्यात तिने खोटी माहिती दिली. अशा प्रकारे सरकारी जमिनी बळकावून खासगी व्यक्तींना विकण्याचे आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे, असे तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते आणि सरकारी वकील नितीन अडागळे यांनी न्यायालयासमोर सांगितले.

