- १६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सौरऊर्जेचा वापर!
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील १६ क्लस्टर्समधील २७ गावांना स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण देण्यासाठी, पीएमआरडीएने १,२०९.०८ कोटी रूपयांच्या खर्चाचा मोठा सांडपाणी (सीवरज) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांची प्रगती आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आज, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची महत्त्वपूर्ण सल्लामसलत व माहितीपर बैठक पार पडली. या बैठकीस आमदार शंकरराव मांडेकर आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह संबंधित २७ गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश स्वच्छता पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, प्रगत सांडपाणी विल्हेवाट प्रणाली विकसित करणे आणि कार्यक्षम व किफायतशीर सांडपाणी प्रक्रिया राबवून नद्यांचे प्रदूषण कमी करणे (Pollution abetment of Rivers) हा आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती आणि उद्योगासारख्या कामांसाठी पुनर्वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे. महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी प्रशासनाला हे क्लस्टरनिहाय प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले आहेत. मुख्य अभियंता रिनाज पठाण, प्रशांत पाटील आणि कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी यांनी या प्रकल्पांची तांत्रिक माहिती दिली.
नेमणूक केलेल्या सल्लागार संस्थेमार्फत प्रत्येक योजनेचे तांत्रिक स्पष्टीकरण देण्यात आले. या स्पष्टीकरणामध्ये माहिती संकलन, प्रक्रिया, सखोल नियोजन पद्धती, तसेच शाश्वत, किफायतशीर आणि कमी मनुष्यबळावर चालणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांवर भर देण्यात आला. प्रकल्पांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यावर पुढील ५ वर्षांचा संचलन व देखभाल (O&M) कालावधी देखील योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. भविष्यकालीन वाढ लक्षात घेऊन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी आवश्यक जमीन नियोजनबद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजनांचा भाग म्हणून सौरऊर्जा प्रणालीचा समावेश असून, त्यामुळे खर्चात मोठी बचत होईल. विशेषतः ‘सणसवाडी’ क्लस्टरमध्ये ५५९.४०४ किलोवॅट (Kwp) क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. तसेच, प्रकल्पांचे रिअल-टाईम निरीक्षण व कार्यनियंत्रण करण्यासाठी स्काडा (SCADA) आधारित स्वयंचलित प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या हितधारक बैठकीमुळे स्थानिक ग्रामपंचायती, प्रशासन आणि तांत्रिक सल्लागार यांच्यात समन्वय वाढला असून, शहरी वाढ केंद्रांमधील स्वच्छता आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

