पुणे, १६ डिसेंबर
भारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे अनेक देश विविध प्रकारे भारताविरुद्ध षड्यंत्रे रचत आहेत. नवा भारत खूप काही नवे, सकारात्मक आणि चांगले घडवत आहे. लक्षणीय प्रगती करत आहे. हा नवा भारत भारतीयांनी समजून घ्यायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.
‘कौशिक आश्रम’ आणि ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमाले’त डॉ. निरगुडकर बोलत होते. ‘अस्थिरता, फुटीरतावाद आणि भारत’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
नव्या भारतात जे काही चांगले घडत आहे, ते लोकांसमोर येऊ नये आणि देशाचे नकारात्मक चित्र लोकांसमोर उभे रहावे, असे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. अशा खोट्या कथ्यांवर (नॅरेटिव) विश्वास न ठेवता त्यांना आपण पराभूत करू या, असे आवाहन डॉ. निरगुडकर यांनी केले.
व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प डॉ. संजय उपाध्ये यांनी गुंफले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मानवतेला शांती मिळवून देणारा सद्गुण आणि विचार भारताकडे आहे. हिंदू सनातन चिंतनातूनच जगाला शांती मिळू शकते. त्यासाठी साऱ्या भारतवासीयांना एकत्र यावे लागेल. प्रत्येकाला चांगल्या कार्यात सक्रिय व्हावे लागेल, व्यक्त व्हावे लागेल, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा लागेल. राष्ट्राच्या उद्धारासाठी काम करावे लागेल, असे डॉ. उपाध्ये म्हणाले. जेष्ठ कार्यकर्ते दिवाकर पांडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
श्रेया रासनेचा विशेष सन्मान
व्याख्यानमालेत श्रेया रासने हिचा मानपत्र आणि अकरा हजार रुपये देऊन विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत श्रेयाने लिहिलेल्या ‘प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम्’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचे तसेच दिग्दर्शन आणि लेखन यासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. श्रेया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वेदांत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिला नाट्यकलेची विशेष आवड आहे.

