पुणे- जिथे शक्य असेल, तिथे युती करा, शरद पवारांच्या पक्षासोबत जुळवून घेण्यासही हरकत नाही अशा शब्दात भाजपा नेते देशाचे गृहमंत्री अमित सहा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ‘हिरवा कंदील’दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शाहांशी केलेल्या 15 मिनिटांच्या चर्चेत महापालिका निवडणुकांचे रणनीती ठरवण्यात आली असून, अमित शाह यांनी स्थानिक पातळ्यांवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे समजते.अमित शाह यांनी लवकरच महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाशी बोलण्याचे आश्वासन पटेल आणि तटकरे यांना दिले आहे. या भेटीनंतर आता वेगाने सूत्रे हलली असून, उद्याच (बुधवारी) अजित पवार गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला आणि स्थानिक युतींबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी अजित पवार गटाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे युती करून निवडणुका लढा,” असा सल्ला शाहांनी दिला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर द्यावा, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
स्थानिक राजकीय गणिते जुळवण्यासाठी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जावे लागले किंवा काही ठिकाणी जुळवून घ्यावे लागले, तर त्याला अमित शाह यांची काहीही हरकत नसल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

