पुणे-माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीच ही जमीन मिळवण्यासाठी चार वर्षांपासून स्वतः पाठपुरावा केल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले.हे प्रकरण गुंडाळण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल तेजवानी यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जात मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८८ च्या मिळकतीचा ताबा मूळ वतनदारांना योग्य सारा स्वीकारून सातबारा उताऱ्यावर त्यांची नावे लावण्याची मागणी केली होती. १५ डिसेंबर २०२० रोजी हा अर्ज हवेली तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आणि मिळकतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले गेले. मात्र, त्यानंतर या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही.
दरम्यान, २८ डिसेंबर २०२० रोजी अमेडिया कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने १ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कुळकायदा शाखेकडे अर्ज करत, तेजवानी यांच्या अर्जावर तात्काळ सुनावणी घेऊन सार्याची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावण्याची मागणी केली. कुळकायदा शाखेने ११ जून २०२१ रोजी तेजवानी यांना खुलासा सादर करण्यास सांगितले. तेजवानी यांनी २३ जून २०२१ रोजी खुलासापत्र देऊन सारा भरवून नोंदणी करण्याची मागणी केली.
२०२१ नंतर थेट ३० डिसेंबर २०२४ रोजी कब्जा हक्काची रक्कम भरण्यात आली. त्यानंतर २०२५ मध्ये या मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले आणि अमेडिया कंपनीने मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कुंभार यांनी दिली. पार्थ पवार यांनीच अमेडिया कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता, असेही कुंभार यांनी स्पष्ट केले.
४ ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी या जमिनीचा गैरव्यवहार उजेडात आला. या सर्व प्रकारानंतरही ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमेडिया कंपनीने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. या पत्रात कंपनीने कायदेशीर पैसे भरून जमीन घेतल्याचे नमूद केले होते, मात्र वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे कंपनी व्यथित झाली असून, बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. या पत्रावरही पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे, त्यामुळे या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग उघड होत असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करावी, तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी धोरण आखावे, अशी मागणीही कुंभार यांनी केली.
मुंढवा येथील शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी हिला अटक झाली. काल तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेजवानी तपासाला सहकार्य करत नसल्याचे सांगून पोलीसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तेजवानी हिला अटक झाल्यानंतर मोठ काही तरी निष्पन्न होईल असं वाटलं होतं. हे प्रकरण कितीही मोठ असलं तरी या प्रकरणात पार्थ पवार यांच नाव पुढे येऊ न देन, राजकीय नेते, त्यांच्या मुलांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने फारसा तपास न करता हे प्रकरण गुंडाळण्याची भूमिका पोलीस आणि प्रशासनाची होती. त्यामुळे संशय बळावतोय.

