पुणे–सद्यस्थितीत देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील एकमेव योग्य व्यक्ती आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामु्ळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 19 तारखेला देशाच्या राजकारणात उलथापालथ होऊन मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे. त्यांच्या विधानावर राज्यासह संपूर्ण देशात वेगवेगळी चर्चा सुरू असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील एका कार्यक्रमात बोलताना वरील विधान केले आहे. ते म्हणाले, मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत असे स्वप्न पाहिलेला कार्यकर्ता आहे. पण माझेही म्हणणे आहे की, सद्यस्थितीत पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा महाराष्ट्रातील कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना आपण 2029 पर्यंत महाराष्ट्रातच असल्याचे विधान केले होते. पण गत काही दिवसांत त्यांचे नाव थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आले आहे. पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदावरून पाय उतार झाल्याच्या स्थितीत फडणवीस हेच त्यांची जागा घेण्यासाठी योग्य उमेदवार आहेत असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतले जात होते. पण आता स्थिती बदलली आहे.
पृथ्वीराज चव्हाण अमेरिकेतील एपस्टीन फाईल्सचा दाखला देत म्हणाले होते, 19 डिसेंबर रोजी देशात मोठा राजकीय भूकंप होईल. त्या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल. एक मराठी माणूस पंतप्रधान होईल. ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता, त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यांत कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्याच्याकडे जगातील अनेक बड्या व्यक्तींचे फोटो व व्हिडिओ आहेत.ही एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्यास अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध होता. पण जनरेट्यामुळे त्यांना या फाईल्स उघड कराव्या लागणार आहेत. 19 डिसेंबर रोजी त्यापैकी काही फोटो व ईमेल सार्वजनिक केले जातील. त्यात भारतातील काही व्यक्तींचा समावेश असू शकतो. त्यामुळे भारतात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. असे घडले तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आधघाडीतील कुणालाही पंतप्रधानपदाची संधी मिळण्याची शक्यता नाही. कारण, आची तेवढी संख्या नाही. पण नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, असे चव्हाण म्हणाले होते.

