29 महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे प्रतिपादन
मुंबई- आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास महायुतीच करू शकते हा विश्वास मतदारांना आहे. मतदारांनी महायुतीचा 3.5 वर्षांचा विकासाचा कारभार पाहिला आहे आणि त्याचबरोबर गेल्या 25 वर्षांतील मुंबई महापालिकेतील कारभार पाहिलाय, उबाठा सरकारचा 2.5 वर्षे घरी बसून केलेला खंडणी गोळा करण्याचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे विकासासाठी मतदारांचा महायुतीलाच आशीर्वाद मिळेल आणि सर्व 29 महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे असे म्हणत ऊर बडवणा-यांसाठी ही मराठी माणसासाठी ची लढाई नाही तर एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे अशी टीकाही श्री. बन यांनी केली.
यावेळी श्री. बन यांनी मुंबई मध्ये बिना नावाची उबाठा गटाची पोस्टर्स लावल्याबद्दल उबाठा गट, राऊत यांना लक्ष्य केले. उबाठा गटाचे नाव लावून पोस्टर लावायची हिंमत नाही. आचार संहितेत पोस्टर्स लावता येत नाहीत, तेव्हा अशा अनौरस पोस्टर्सची चौकशी व्हावी अशी मागणी श्री. बन यांनी केली. ‘फटा पोस्टर निकला हिरो’ म्हणतात त्या पद्धतीने हे पोस्टर फाटले असून भारतीय जनता पार्टी महायुतीचा हिरो मुंबईमध्ये बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला. आपल्या नावाने जर मुंबईत पोस्टर्स लावली तर अजिबात मते मिळणार नाहीत म्हणून उबाठा गटाने अशी बिना नावाची अनधिकृत पोस्टर्स लावली आहेत असा हल्लाबोल करत श्री. बन यांनी या बेनामी पोस्टर्सच्या खर्चाकडेही निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी मागणीही केली . स्वतःच्या भावाच्या मनसे पक्षाचे सात नगरसेवक फोडून त्यांचा पक्ष फोडला तेव्हा पैशांचा बाजार हा उद्धव ठाकरे, राऊत आणि उबाठा गटाने मांडला होता याचीही आठवण श्री. बन यांनी करून दिली.
सूर्य चंद्र हे कुणाचे बाप आहेत का आई आहेत का या बुद्धी भ्रष्ट झालेल्या राऊतांच्या वक्तव्यावर निशाणा साधत श्री. बन म्हणाले की हल्ली राऊत आणि उबाठा गटाला सूर्य नाही तर त्यांना चांद जास्त प्रिय झाला आहे. हिरव्या झेंड्यावर असलेला चांद हा त्यांच्या पक्षाचा झेंडा झालेला आहे म्हणूनच असे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे वक्तव्य ते करत आहेत.
मुंबई उद्योगपतींच्या घशामध्ये घातली जात आहे असा धोषा लावणा-या राऊतांवर पलटवार करत श्री. बन म्हणाले की, ज्या उद्योगपतींच्या घरच्या लग्नात तुमच्या लोकांनी नाचण्यामध्ये धन्यता मानली त्या उद्योगपतींबद्दल कोणत्या तोंडाने टीका करत आहात. कुठल्याही उद्योगपतीच्या घशात मुंबई जाणार नाही. मुंबई ही सर्वसामान्य नागरिकाची, सर्वसामान्य मराठी माणसाची आहे याचा पुनरुच्चारही श्री. बन यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस वर टीकेची झोड उठवत श्री. बन म्हणाले की त्यांच्या पक्षात सुरुवातीपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते म्हणजे शरद पवार. मात्र भाजपामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हाच भाजपा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे.
काँग्रेसने उबाठा गटाची लायकीच ठेवली नाही
उबाठा गट जर राज ठाकरे यांच्यासोबत जाणारा असेल तर काँग्रेस तुमच्यासोबत येणार नाही असे स्पष्ट करत ‘वापरा आणि फेकून द्या’ या पद्धतीने काँग्रेसने उबाठा गटाला वा-यावर सोडले आहे. काँग्रेसने तुमची लायकी दाखवून दिली आहे अशी घणाघाती टीका श्री. बन यांनी केली. ठाकरे बंधूंची दोन शून्ये एकत्र आली तर काँग्रेसचे उरलेसुरले अस्तित्व ही संपेल हे काँग्रेसला कळून चुकले आहे.

