छत्रपती संभाजीनगर-राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “आम्ही मुंबई लुटली असा आरोप करणाऱ्या भाजपने 25 वर्षे उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे चेअरमनपद भोगले. तेव्हा लुटताना तुम्ही कुठे होतात?” असा तिखट सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपच्या टीकेचा समाचार घेताना दानवे म्हणाले, “महापालिका निवडणुका जशा घोषित झाल्या, तशा चोरांनीच उलट्या बोंबा सुरू केल्या आहेत. मुंबई, महाराष्ट्राविषयी उलट्या बोंबा महाराष्ट्रात विशेषत: भाजपच्या चोरांनी त्या सुरू केलेल्या आहेत. ज्या लोकांनी नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस पाडला आणि भाजपच्या संघटन मंत्र्यांना विदर्भाच्या बैठकीत सांगावे लागले की, निवडणुकीत पैसा आणि संपत्तीचे ओंगाळवाणे प्रदर्शन करू नका. ते लोक उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठ्या प्रमाणात लाखो कोट्यवधी रुपये निवडणुकीत टाकणार, 25 वर्षांत मुंबई लुटली असे म्हणत आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
मुंबई लुटत असताना तुम्ही कुठे होतात? शिवसेनेचा महापौर असताना, भाजप उपमहापौरही सतत होता. स्थायी समितीमध्येही भाजपचे लोक होते. वेगवेगळ्या समितीचे चेअरमन देखील भाजपचेच लोक होतै. त्यामुळे हा आरोप करताना, तुम्ही त्यावेळेस कुठे होते? हा देखील महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीच्या निमित्ताने आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली.
महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा दावाही अंबादास दानवे यांनी केला. “एकीकडे महायुती म्हणायचे आणि दुसरीकडे बैठकीला अजित पवारांच्या पक्षाला बोलावायचे नाही, हा प्रकार सुरू आहे. मुंबईत नवाब मलिक पक्ष चालवतात म्हणून, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक समीकरणांमुळे भाजप अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नाही. निवडणुका जाहीर होऊन 12-15 तास उलटले नाहीत तोच महायुतीची ‘तंतरली’ आहे. त्यांना पराभवाची भीती सतावू लागली आहे,” असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, “ठाकरे बंधूंची युती होणार, अशापद्धतीने पूर्णपणे निर्णय झालेला आहे. खासदार संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेत आहेत. आता या युतीसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. अगदी थोड्याच दिवसांत ठाकरे गट आणि मनसेची युती घोषित होऊ शकते.”
“संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला ग्रामीण भागात ‘कर’ किंवा ‘कंक्रांत’ म्हणतात. यंदा 15 जानेवारीला महाराष्ट्राची जनता भाजपवर ही ‘कर’ काढणार आहे. आता मराठी माणसाने जागे होणे आवश्यक आहे,” असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले.

