पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर आज निवडणूक आयोगाने जाहीर केली. पण इतके वर्ष लांबवलेली निवडणूक अवघा महिनाभरात उरकण्याचा डाव निवडणूक आयोगाने टाकला. अर्ज माघारीचा दिवस आणि प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात अवघ्या १५ दिवसांचा कालावधी आहे. यात सर्व पक्षांची दमछाक होईल असा बहुदा आयोगाचा कयास असावा. पण निवडणूक आयोगाने टाकलेल्या या गुगलीवर विजयाचा षटकार मारण्यासाठी पुण्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे .
ही निवडणूक संपूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. म्हणूनच जवळपास एका महिन्यापासून इच्छुकांचे अर्ज मागवणे, मुलाखतीचा कार्यक्रम ठरवणे, जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी, उमेदवारांसोबत चर्चा करणे, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसोबत चर्चा करणे या सगळ्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी घेतली आहे. पुढील काही दिवसात महाविकास आघाडीतील जागावाटपाचे सूत्र अंतिम करून उमेदवार ठरवण्यात येतील असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुणेकरांची केलेली निराशा, सगळीकडे असलेले गुन्हेगारीचे राज्य, पाण्याची टंचाई, कासव गतीने चालणारी वाहतूक, जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग, हजारो कोटींचा भ्रष्टाचार हे चित्र पाहता यंदा पुणेकर नागरिक महाविकास आघाडीला आपला कौल देतील हा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

