पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रवादी कामगार युनियन यांच्यात सन 2025–26 या कालावधीसाठीचा वेतन करार नुकताच यशस्वीपणे संपन्न झाला. कामगारांच्या हिताचा विचार करून झालेल्या सविस्तर चर्चेनंतर चार वर्षांसाठी एकूण 21,500 रुपयांची वेतनवाढ मंजूर करण्यात आली असून 88,000 रुपये वेतन फरक देण्यास व्यवस्थापनाने सहमती दर्शवली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य सुरक्षेसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचा मेडिक्लेम लाभही कंपनीने मान्य केला.
हा करार खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम करण्यात आला. वेतनवाढ टप्प्याटप्प्याने लागू राहणार असून पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 25 टक्के, तिसऱ्या वर्षी 15 टक्के आणि चौथ्या वर्षी 10 टक्के अशी अंमलबजावणी होणार आहे. हा वेतन करार पुण्यातील खराडी येथील हॉटेल रेडिसन ब्लू येथे संपन्न झाला.
करारावेळी राष्ट्रवादी कामगार युनियनतर्फे कार्याध्यक्ष महेश पाटील आणि सरचिटणीस प्रसाद तनपुरे उपस्थित होते. व्यवस्थापनाकडून साईट डायरेक्टर उदयजी शेट्टी, साईट मॅनेजर संदीप जावळे, एच.आर. हेड सुस्मिता मिश्रा, एच.आर. मॅनेजर नितीन पाठक, प्रोडक्शन मॅनेजर प्रफुल्ल भावसार आणि ऑफिसर मोनाली तारी यांनी सहभाग नोंदवला. कामगार प्रतिनिधी म्हणून युनिट अध्यक्ष महेंद्र यादव, उपाध्यक्ष सागर फलके, सचिव विशाल गरुड, शंकर हाडके तसेच सहसचिव व खजिनदार सचिन परकाळे यांनी स्वाक्षरी करून करारास मान्यता दिली.
हा करार कंपनीतील चौथा सलग करार असून गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी कामगार युनियन कंपनीत कार्यरत आहे. कंपनी, कामगार आणि संघटना यांच्यात कुटुंबवत्सल व सदभावनेचे वातावरण राखत हा करार पूर्ण झाल्याचे समाधान व्यवस्थापनाने व्यक्त केले. यापुढेही परस्पर विश्वास आणि सलोख्याच्या वातावरणात कामगार जोमाने काम करतील, असा विश्वास कार्याध्यक्ष महेश पाटील यांनी व्यक्त केला.

