शिरूर-जुन्नर सीमेवरील पारगावमधील घटना
पुणे- जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जुन्नर-शिरूर सीमेवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात आज पुन्हा एकदा बिबट्याने एका मुलाचा बळी घेतला. आई-वडील शेतात काम करत असताना बाजूला खेळणाऱ्या 8 वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेऊन ठार केले. रोहित काफरे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे कुटुंब शेतमजूर असून ते पारगाव शिवारातील एका शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. आई-वडील कामात व्यस्त असताना रोहित शेताच्या बांधावर खेळत होता. त्याचवेळी शेजारील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधत अचानक रोहितवर झडप घातली. काही कळायच्या आतच बिबट्याने त्याला ऊसात फरफटत नेले. आरडाओरडा ऐकून आई-वडील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या हल्ल्यात रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रोहितच्या मृत्यूने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत या परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यातील हा चौथा मृत्यू आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. “प्रशासन अजून किती निष्पाप जिवांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरे लावण्याची आणि रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी लावून धरली आहे.

