पुणे- महापालिकेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन घोषणा करताच पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट केला ते म्हणाले , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी भाजपा ची युती असेल , त्यांचे कार्यकर्ते आमच्या पक्षात घ्यायचे नाहीत आणि आमचे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या सेनेत घ्यायचे नाहीत हे ठरलंय..पण पुण्या पिंपरीत अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या युतीशी मैत्रीपूर्ण लढत देईल . अजितदादांचा पक्ष आणि आम्ही एकमेकाविरोधात मैत्रीपूर्ण लढू .
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आगामी महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत. 15 जानेवारीला सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कारण, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरवशावर चालवणे हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हते. तथापि न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केले काम पाहता पुन्हा कौल आमच्या बाजूने येईल आणि जनता शहर विकासाची संधी आम्हाला देईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महायुती या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद दोन ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती देखील होईल. आता पुण्यात मात्र अजित पवार आणि आमची चर्चा झाली आहे, भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने लढताना तुम्हाला दिसेल. परंतु, ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेत आरक्षण हे 50 टक्क्यांच्या वर गेले आहे. परंतु, माननीय सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले आहे की यांच्या निवडणुका घ्या, फक्त जी निकाल असेल तो आमच्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहील आणि अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या दोन महानगरपालिकांना लागू होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना सोबत असणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, शिवसेना शक्य तितक्या ठिकाणी आमच्या सोबत असेल. तसेच मतदार याद्यांमधील घोळावर देखील फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले, मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे, हे आम्ही देखील दाखवले आहे. पण त्यासाठी निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असे होऊ शकत नाही. गेले 10-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहीत आहे की कमी अधिक प्रमाणात याद्यांमध्ये घोळ असतोच. आता एसआयआर सुरू झाला आहे, त्यामुळे कदाचित हा घोळ कमी होईल आणि पुढच्या काळात माझे तर मत असे आहे की निवडणूक आयोगाने आपल्या याद्या ब्लॉक चैनमध्ये टाकाव्यात.
सध्या भाजपमध्ये अनेक नेते पदाधिकारी प्रवेश करत आहेत, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहे. फक्त कोणाला घ्यायचे आणि नाही घ्यायचे याचा निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे प्रमुख नेते घेतील. एक पक्का निर्णय आहे की आमचे आणि शिंदे साहेबांचे ठरले आहे की एकमेकांचे घ्यायचे नाहीत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याचा भाजप तसेच महायुतीला काही फटका बसेल का? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काही फटका बसणार नाही, दोन्ही ठाकरे आणि कॉंग्रेस एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. मुंबईकर आमच्या भाजपला आणि महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचे आम्ही जोपासलेले हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिले आहे. त्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केल.
कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस प्रधानमंत्री बनेल असे भाकीत केले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत अनेक नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पीएमओचे मंत्री राहिले आहेत, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर, तर मात्र निश्चितपणे यात काही तरी काळं बेरं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय चांगले नेते आहेत, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे अशी त्यांना शुभेच्छा आहे. अशा प्रकारचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये, असा माझा त्यांना सल्ला आहे, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.

