मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने, पुढील महिन्यात राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुका होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आयोगाने पत्रकार परिषद जाहीर केल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंकडून हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आता विरोधकांनी आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आयोगाची ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मतदार याद्यांमध्ये जो मोठा घोळ घालण्यात आला आहे, तो दुरुस्त कसा केला याची माहिती लोकांना देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे की थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी? असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका, दुबार नोंदी आणि अनियमितता असल्याचा आरोप करत, त्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणे म्हणजे जनतेला फरफटत नेण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आयोगाने आधी झालेल्या चुका मान्य करून त्या कशा दुरुस्त केल्या याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
किशोरी पेडणेकर यांनी पुढे बोलताना, निवडणूक कार्यक्रम थेट जाहीर केला गेला तर त्याला लोकशाही प्रक्रियेचा अपमान म्हणावे लागेल, असा इशाराही दिला. मतदार यादीतील घोळ काय आहे, हे सांगायचं नाही आणि थेट तारखा जाहीर करायच्या, याचा अर्थ दंडेलशाही सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी यावर आवाज उठवला तर निवडणुकांना विरोध करणारे, असा ठपका ठेवला जाईल, मात्र आमचा निवडणुकीला विरोध नसून केवळ मतदार यादीतील चुका आधी दुरुस्त करण्याची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किमान 100 पैकी 70 ते 75 टक्के चुका पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतरच निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी ठाम मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. अन्यथा ही प्रक्रिया निष्पक्ष आणि विश्वासार्ह राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.
या मुद्द्यावर काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर कठोर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत, ही प्रक्रिया लोकशाही मजबूत करण्याऐवजी लोकशाहीचे हनन करणारी असल्याचा आरोप केला आहे. मतदार यादीत स्पष्टपणे घोळ असताना त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दुबार मतदानासारख्या गंभीर मुद्द्यांकडे कानाडोळा करणे ही बाब चिंताजनक असून, अशा परिस्थितीत निवडणुका जाहीर करणे म्हणजे लोकशाही मूल्यांना तडा देण्यासारखे असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आयोगाने आधी पारदर्शकपणे या सर्व मुद्द्यांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे.
दरम्यान, आज जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमात राज्यातील सुमारे 15 मोठ्या महापालिकांचा समावेश असण्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांतील महापालिका निवडणुका राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात आहेत. त्यामुळे आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाची मुदत, तर दुसरीकडे मतदार यादीतील कथित घोळ यामुळे निवडणूक प्रक्रियेवर वाद निर्माण झाला आहे. आज सायंकाळी आयोग नेमकी कोणती घोषणा करतो, आणि विरोधकांच्या आक्षेपांना कसा प्रतिसाद देतो, यावरच येत्या काळातील राजकीय तापमान अवलंबून असणार आहे.

