नागपूर, दि. १४ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच महायुतीतील इतर मंत्री व आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट दिली. यावेळी संघाचे आद्य संस्थापक व पहिले सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळी सर्व मान्यवरांनी दर्शन घेऊन अभिवादन केले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे जन्मशताब्दीचे वर्ष असून नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथे येण्याचा योग आला. देशात विघटनवादी शक्ती विविध प्रकारे सक्रिय असताना राष्ट्रात सकारात्मक, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे यासाठी संघ सातत्याने संस्कार, विधायक आणि रचनात्मक कार्य करत आहे. त्या कार्याची माहिती आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून आहे. आज येथे अनौपचारिक संवाद आणि मार्गदर्शनही मिळाले. स्मृतीस्थळी नतमस्तक होत विधिमंडळात जे काही चांगले काम झाले आहे ते अधिक गतीने पुढे नेण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणानुसार आज आम्ही डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम” — माझे स्वतःचे काहीही नाही, माझे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित आहे, ही संघाची विचारसरणी आहे. सामान्य माणसाला असामान्य घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अत्यंत गौरवास्पद वाटते.
डॉ. हेडगेवार यांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून लोकांना एकत्र आणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या संघाच्या कार्यातून गुणवत्ता वाढवण्याची दिशा कशी दिली जाते, याचे स्पष्ट उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेले “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हे तत्त्वज्ञान ही अशाच सामाजिक भूमिकेची आठवण करून देते. त्यामुळे येथे आल्यावर प्रेरणा आणि नवउत्साह मिळाला, असेही विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले.

