अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी; १५ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया, फेब्रुवारीत सोडत; पीएम आवास अनुदानाचा लाभ!
पुणे – पुणे महानगर प्रदेशात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) एकूण ८३३ सदनिकांची मोठी ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे. ही सोडत अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) यांच्यासाठी असून, सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या सोडतीअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे एकूण ३४० सदनिका उपलब्ध असून, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५५ तर अल्प उत्पन्न गटासाठी २८५ सदनिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पेठ क्रमांक १२ येथील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.५० लाख रुपयांचे अनुदान लागू राहणार आहे. याशिवाय पेठ क्रमांक ३०-३२ येथे उर्वरित ४९३ सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०६ आणि अल्प उत्पन्न गटासाठी १८७ सदनिकांचा समावेश आहे.
सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, अर्ज भरणे तसेच पेमेंट प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल. ऑनलाईन नोंदणीची सुरुवात १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे आणि ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची प्रक्रिया १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. अर्जदारांना नोंदणी व अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची अंतिम वेळ २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ पर्यंत असेल. तसेच बँक आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची प्रारूप यादी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील. अंतिम यादी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सदनिकांची ऑनलाईन सोडत काढण्यात येईल. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता यशस्वी अर्जदार तसेच प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे पीएमआरडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या योजना व सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे राहतील, असेही पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

