नागपूर – “आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’ आहेत, तर अशा डकैतांना पाणी पाजणारे आम्ही ‘धुरंधर’ आहोत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना, “इलाका किसी का भी हो, धमाका महायुती करेगा. हमारी सारी योजना हैं गेम चेंजर, कॉर्पोरेशन का इलेक्शन जित कर हम ही होंगे धुरंधर.” या शायरीतून टोलेबाजी केली.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “माझे नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस उगवत नाही आणि मावळतही नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मला घटनाबाह्य म्हटले जाते. पण मी टीकेला टीकेने नाही, तर कामाने उत्तर देतो. लोक मला DCM म्हणतात, याचा अर्थ ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असा आहे. सर्वसामान्य घरातील व्यक्ती पदावर बसल्याने काहींना जळजळ होत आहे.”
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो. त्यावर बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सूर्य-चंद्र आले किंवा कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. उलट मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करत आहोत.”
“मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनी 23 जानेवारी निमित्त योजना पुष्प अर्पण करणार आहोत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र आम्ही लावले. मी मुख्यमंत्री झाल्यावर आयुक्तांना बोलवून निर्णय घेतला आणि आपण 300 एकरचे सेंट्रल पार्क आज करतोय. पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी आम्ही राज्यातील सर्व शहरांतील गार्डनसाठी पैसे दिले,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.यावेळी त्यांनी मुंबईतील कोस्टल रोड, पॉड टॅक्सी आणि ३०० एकरांच्या सेंट्रल पार्कसारख्या प्रकल्पांची माहिती दिली.
शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेवरून शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची मदत दिली. निकष, नियम बदलून शेतकऱ्यांना मदत केली. त्यावर आता काहीजण कर्जमाफीचं विचारलं जातंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच, हा आमचा शब्द आहे. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी दिलेला शब्द पाळतो, त्याला ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हणत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
तसेच, “लाडकी बहीण योजना बंद पडेल, अशी आवई उठवली जात होती. पण अजूनही सुरू आहे. जे कोर्टात गेले ते, हरले. पण कोणीही ‘माई का लाल’ आला तरी लाडक्या बहिणीची ओवाळणी बंद होणार नाही. त्यांना २१०० रुपये देणार म्हटले तर देणारच,” अशी ठाम ग्वाही एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

