मुंबई, १ ४ डिसेंबर २०२५: देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीपूर्वी एकाच हफ्त्यात नुकतीच परतफेड केली. अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याज दराचे कर्ज उभारून तसेच स्वनिधीतून ही परतफेड केली असून त्यामुळे व्याजाच्या रकमेत मोठी बचत होईल, अशी माहिती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची सूचना केली असून त्यादृष्टीने कंपनीवरील कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी यशस्वी पावले टाकण्यात आली.
महावितरणने विविध टप्प्यांवर स्टेट बँकेकडून एकूण १२,८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी ८.६५ टक्के ते ९.२५ टक्के दराने व्याज द्यावे लागत होते. त्याऐवजी अन्य वित्तीय संस्थेकडून ७,१०० कोटी रुपये कर्ज ८.२५ टक्के इतक्या कमी व्याजदराने उभारून महावितरणने स्टेट बँकेचे ७,१०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले. त्या खेरीज महावितरणने स्वनिधीतून ५,६३४ कोटी रुपयांचे स्टेट बँकेचे कर्ज फेडले.
महावितरणने स्टेट बँकेचे कर्ज घेताना आपल्या दहा सर्कलमधील महसूल तारण म्हणून ठेवला होता. या सर्कलमध्ये वार्षिक तीस हजार कोटी रुपयांचा महसूल आहे. स्टेट बँकेचे सर्व कर्ज फेडल्यामुळे हा महसूल तारणमुक्त होईल. त्या आधारे कंपनीला ५०,००० कोटी रुपयांपर्यंतचा निधी माफक व्याजदरात कर्जरुपाने उभा करता येईल.
महावितरणची पत वाढविणारे पाऊल – महावितरणने एकाच हफ्त्यात स्टेट बँकेच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यामुळे कंपनीची वित्तीय बाजारातील पत वाढली आहे. ही घडामोड गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारी आहे. कंपनीसाठी भविष्यात खासगी किंवा सार्वजनिक बाँड उभारायचे झाल्यास त्यासाठीही इतक्या मोठ्या कर्जाची परतफेड करणे उपयुक्त ठरणारे आहे. आगामी काळात महावितरणला शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याच्या दृष्टीनेही ही कर्जाची परतफेड महत्त्वाची आहे.

