नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार ही गंभीर समस्या बनली आहे. जवळपास रोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असून अनेक ठिकाणी निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर वनखात्याकडून सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांवरून राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेत बोलताना तीव्र नाराजी व्यक्त करत, हा निर्णय अत्यंत हास्यास्पद असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यावर उपाय शोधताना गंभीरतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
अजित पवार यांनी बिबट्यांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, राज्यात बिबट्यांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यांना पकडून वनतारामध्ये हलवण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी वास्तव मांडले. वनताराकडून राज्य सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ते 50 पेक्षा अधिक बिबट्यांना सामावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व बिबटे पकडून वनतारामध्ये सोडणार, अशा चर्चा प्रत्यक्षात अमलात आणणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच संदर्भात जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याच्या कल्पनेवर अजित पवारांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिबट्यांची नसबंदी हा पर्याय चर्चेत असला तरी, त्याचे परिणाम दिसायला अनेक वर्षांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तातडीच्या समस्येवर दीर्घकालीन आणि अव्यवहार्य उपाय सुचवले जात असल्याचा सूर त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे उमटला.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे यांसह ग्रामीण आणि शहरी भागांत बिबट्यांचा शिरकाव वाढला आहे. मानवी वस्तीच्या आसपास बिबटे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. लहान मुले, शेतकरी, महिला आणि वृद्ध हे हल्ल्यांचे बळी ठरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जंगलाबाहेर बिबटे येऊ नयेत, यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामागे जंगलातील भक्ष्याची कमतरता हे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र, या उपायावर आता प्रशासन, राजकारण आणि समाजातील विविध घटकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन करताना सांगितले होते की, सध्या जंगलांमध्ये हिंस्त्र प्राण्यांसाठी आवश्यक असलेले भक्ष्य उपलब्ध नाही. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळत आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांसाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग लावून जंगलात सोडण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रत्येक गावात जसा नंदी असतो, तशाच पद्धतीने या शेळ्या-बकऱ्या असतील, असे उदाहरण देत त्यांनी या योजनेचं समर्थन केलं होतं. काही ठिकाणी वनखात्याने अशा शेळ्या सोडल्याचा दावा करत, नागरिकांनी त्यांचे संरक्षण करावे, जेणेकरून बिबट्यांचा धोका माणसांवर येणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, या योजनेच्या व्यवहार्यतेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
याचबरोबर, गणेश नाईक यांनी बिबट्यांना आफ्रिकेला पाठवण्याबाबतही वक्तव्य केल्याने वाद अधिकच वाढला. ज्या भागांत बिबट्यांची संख्या जास्त आहे, तेथील बिबटे आफ्रिकेला हलवण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. आफ्रिकेमध्ये वाघ आणि सिंह आहेत, मात्र बिबटे नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे तिकडे पाठवण्याबाबत केंद्रीय वनखात्याकडे विचारणा केल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत असताना, दुसरीकडे उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने राज्य सरकारसमोर ही समस्या अधिकच आव्हानात्मक बनली आहे. अजित पवार यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार कोणती ठोस आणि व्यवहार्य भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

