नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता झाल्या आहेत हे शोभनीय नाही. मुंबई सारख्या शहरातून जर हे होत असेल तर महाराष्ट्रामधील नागरिकांमध्ये भीतीचे काय वातावरण आहे हे आपल्याला कळेल, हे सर्व रॅकेट आहे. सरकार विरोधकांवर आमदारांवर कारवाई करत असताना ही गँग कधी मोडणार आहे. या गँगबद्दल सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, ते पकडले जातात आणि बेलवर बाहेर येतात. यावर काही कारवाई होणार का नाही? असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे.
सचिन अहिर म्हणाले की, आजच सकाळी राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे. आम्ही स्थगन प्रस्ताव मांडतो आहोत पण आम्हाला वेळ दिली जात नाही. सरकारला हे आकडे लपवायचे आहेत का? राज ठाकरे यांनी पोस्ट केल्यानंतर आता या प्रकरणाला वाचा फुटणार आहे. सभागृहाचे कामकाज तहकुब करत या विषयावर चर्चा झाली पाहिजे.
सचिन अहिर म्हणाले की, बेपत्ता झालेली मुलं सापडली हे सरकारकडून खोटं सांगण्यात येत आहे. बेपत्ता झालेले किंवा हरवलेले 2 ते 5 टक्के मुलं वापस आली आहेत. पण ज्यांचे अपहरण केले ती मुले वापस आली असे जर तुम्ही बोलणार असाल तर त्या अपहरण करणाऱ्यांनी ती वापस आणून सोडली मग काही सौदा झाला का? अपहरण करत मुलांना विकले जाते, त्यांना भीक मागायला लावली जाते. यामध्ये परदेशातील गँग सहभागी आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे.
सचिन अहिर म्हणाले की, अखंड महाराष्ट्र ही आमची भूमिका आहे. भाजपचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री वेगळा विदर्भ आमच्या अजेंडामध्ये आहे स्पष्टपणे सांगत आहेत. कधी करणार हे मात्र ते सांगत नाही. मुख्यमंत्रीपदावर बसून वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडणे योग्य नाही. आमची भूमिका पहिल्यापासून अखंड महाराष्ट्राची आहे. वडेट्टीवार हे कधी तरी आमच्यासोबत होते तेव्हा त्यांची भूमिका काय होती आणि आज त्यांची भूमिका काय आहे हे सर्वांना माहिती आहे.
सचिन अहिर म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात केवळ वेळ घालवण्याचे काम सुरू आहे. यांना लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आणि विरोधक नकोत.

