मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील,” असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या मेगा भरतीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. यानंतर शिंदेंनी तडकाफडकी दिल्ली गाठून अमित शाह यांची भेट घेतली. सुरुवातीला महापालिका निवडणुका वेगळे लढणार असल्याचे भाजप सांगत होती. मात्र, आता युती करून लढू असे आता म्हणत आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाकित केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची ‘पॉवर’ काय आहे, हे भाजपला दाखवून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आता माघार घ्यावी लागणार आहे. शिंदेंची ही किमया असून त्यांनी अमित शाह यांच्यासारख्या नेत्यालाही खिशात घातले आहे. त्यामुळे आता भाजपला शिंदे गटासोबत युती करूनच निवडणुका लढाव्या लागतील.”
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. “शिंदेंना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा. शिंदेंनी जी खेळी खेळली आहे, त्यावरून ते येत्या महिना-दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेच चित्र दिसत आहे,” असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले, “शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. शिंदे आणि पवार यांच्या भेटीतून शिंदेंनी भाजपला योग्य तो संदेश दिला आहे. अमित शाह यांना झुकवण्यामागे या भेटीचाही संदर्भ असू शकतो.”दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये नक्की काय शिजतंय आणि भविष्यात मुख्यमंत्रीपदात बदल होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

