सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर, पुण्यातील औषध विक्रेत्यांसह आठ जणांवर गुन्हा
पुणे- सिक्कीममधील औषध कंपनीचे औषध बिहारमधील परवाने मुदतबाह्य झालेल्या वितरकाच्या नावाने औषधाची बनावट निर्मिती करुन ते देशभर विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील औषध विकत्यांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात औषध निरीक्षक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय 39) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय हसमुख पुनिया (अक्षय फार्मा ,निंबाळकर तालीम चौक, सदाशिव पेठ), अमृत बस्तीमल जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), मनिष अमृत जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), रोहित पोपट नावडकर (रिद्धी फार्मा तराटे कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे), देवेंद्र यादव (सिन्ना फार्मा, बी सी मेडिसिन मार्केट, नय्या गाव, पूर्व, लखनौ), उमंग अभय रस्तोगी (रजा बाजार, रस्तोगी टोला चौक, लखनौ, उत्तर प्रदेश), महेश गर्ग (अमिनाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश) आणि सोनी महिवाल (महिवाल मेडिको, भोरे गोपालगंज, बिहार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ट्रिप्सिन या बनावट औषधाची पुणे शहरामध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्याअनुषंगाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा या दुकानातून औषधाच्या साठ्यामधून चाचणी व विश्लेषणासाठी नमुना घेतला. हे औषध सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीकडे तुलनात्मक अभ्यासासाठी पाठविण्यात आला. त्यामधून ही लबाडी उघडकीस आली.

