पोलिसांनी कोणाला अटक केली, हे आरोपी, सावरी गावातील तेजस लॉज व ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध..?
मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२५
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने छापा टाकला आहे. पण या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या कारवाईत नेमके काय सापडले? असा प्रश्न विचारून गृहमंत्रालयाने यावर खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने ९ डिसेंबरला दोन अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते मेफेड्रॉन पुण्यातील विशाल मोरे या व्यक्तीकडुन आणल्याचे सांगितले. मुंबई पोलीसांनी विशाल मोरेला पकडण्यासाठी सापळा रचला. मेफेड्रोन खरेदी करायचे आहे असे सांगुन १२ डिसेंबरला विशाल मोरेला पिंपरी चिंचवडच्या हद्दीत दोन किलो मेफेड्रोनसह पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात तो मेफेड्रोन तयार करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीसांनी सावरी गावात धाड टाकली असता तिथे एका गुरांच्या गोठ्यात शेड उभारुन मेफेड्रोन तयार करणे सुरु होते. ती जागा गोविंद शिमकर नावाच्या बामणोलीत व्यक्तीची असुन ओंकार दिघे या सावरीत राहणा-या व्यक्तीच्या मार्फत मोरेला भाड्याने दिली होती. पोलीसांनी तिथुनच तीन कामगारांना अटक केली, जे पश्चीम बंगालचे आहेत.
सपकाळ पुढे म्हणाले की, सावरी गावातील गोठ्यात मेफेड्रोन तयार करणा-या तीन बंगाली कामगारांना ओंकार दिघे हा गावातील तेजस लॉजमधुन जेवण आणून देत होता. सावरी गावातील हे तेजस लॉज ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. दिड महिन्यांपुर्वी हे लॉज सुरु झाले असुन प्रकाश शिंदेंनी ते दरे गावातील रणजीत शिंदे याला चालवायला दिले होते. सावरी गावात ज्या जागेवर छापा टाकण्यात आला ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची ? तिथे ड्रग्सची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना ? जादूटोणा सुरु आहे ? की आणखी काही अवैध धंदे ? मुंबई क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकही तातडीने तिथे पोहचले. त्यांना तिथे काय आढळून आले ? या संपूर्ण प्रकरणाची माहिती दडवून सरकार नेमके काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे ? या प्रकरणी संशय बळावत असून गृह विभागाने खुलासा करावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

