मुंबई–सातारा जिल्ह्यात चक्क एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात चक्क एका म्हशीच्या गोठ्यात हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना याचा थांगपत्ताही नसताना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने येथे धाड टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 10 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत ‘ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची आहे का? आणि महाराष्ट्राला यामुळे ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये?’ असे सवाल उपस्थित केले आहेत.
मुंबई गुन्हे शाखेने मुंबईत केलेल्या एका कारवाईत दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून साताऱ्यातील या कारखान्याची माहिती समोर आली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी जावळी तालुक्यातील सावरी येथे एम डी ड्रग्ज या कंपनीवर छापा टाकून तब्बल 15 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. म्हशीच्या गोठ्यात सुरू असलेल्या या कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती व कच्चा मालाचा साठा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन बांगलादेशी कारागीर व अन्य एक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.
हर्षवर्धन सपकाळांचा सवाल या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात नक्की काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची ? तिथे ड्रग्सची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना ? जादू टोणा सुरु आहे की, आणखी काही अवैध धंदे ? मुंबई क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी तिथे का पोहोचले आहेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे ? मुंबई क्राइम ब्रांच ला इथे नेमके कोणते घबाड सापडले आहे? इथे नेमकं काय सुरु आहे ? सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक इथे तातडीने का दाखल झालेत ? इथून जवळच असलेल्या तेजस होटल मध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण आहेत? या सर्व प्रश्नांवर गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये? – अंबादास दानवे
या प्रकरणावरूनठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आला आहे. गृहमंत्री म्हणून जनतेच्या वतीने आपल्याला याबाबत काही प्रश्न आहेत देवेंद्र फडणवीसजी, असे म्हणत त्यांनी खालील पाच प्रश्न विचारले आहेत.
महाराष्ट्राला यामुळे ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये?
साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई-पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकार मधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का?
एक विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे, म्हणून या कारखान्याला अभय होते काय?
मुंबईतील पोलिस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलिस याबाबत गप्प कसे होते?
म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती?

