मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईकडून कोकणाच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार मागून एका कंटेनरवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
ही दुर्घटना सकाळच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत घडली. अपघातग्रस्त वाहन हुंडई कंपनीची ‘ऑरा’ कार असल्याची माहिती मिळाली आहे. कार कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळल्याने वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात कारमधील दोघांनी जागेवरच प्राण सोडले, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या एका जखमी व्यक्तीला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कोलाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या बचावकार्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलटही सहभागी झाले होते. त्यांनी घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. अपघाताचे स्वरूप पाहता वेगावर नियंत्रण नसणे किंवा कंटेनर अचानक थांबल्याने ही धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.

