नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर होत असल्याची धक्कादायक माहिती विधान परिषदेत उघड झाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आमदारांच्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना, राज्यातील ११ शासकीय रुग्णालयांनी स्थानिक स्तरावर खरेदी केलेली औषधे बनावट आढळल्याची कबुली दिली.
बनावट कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर या माहितीमुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे यांच्यासह ३० हून अधिक सदस्यांनी बनावट औषधांच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी घालण्याबाबत शासनाला जाब विचारला होता.
मंत्री झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ ते मार्च २०२५ या काळात घेतलेल्या औषधांच्या नमुन्यांमध्ये मूळ घटकच नव्हते. बनावट औषधांचा पुरवठा राज्यातील तसेच उत्तराखंड, केरळ आणि तामिळनाडू येथील आठ उत्पादक कंपन्या आणि नऊ स्थानिक विक्रेत्यांमार्फत करण्यात आला होता. याप्रकरणी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत चार न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची आणि पुरवठादारांचे सुरक्षा ठेव (अनामत रक्कम) जप्त करण्याची कारवाईही सुरू आहे.
विना प्रिस्क्रिप्शन कफ सिरपची विक्री; २३५ विक्रेत्यांना नोटीस
मध्य प्रदेशातील बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ सिरप’ (बॅच क्रमांक एसआर-१३) बाबत अन्न व औषध प्रशासनाने तातडीने अलर्ट जारी केला होता. बीड, नांदेड, नागपूर, वर्धा, ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये या बनावट औषधांची खरेदी झाली होती. विना-प्रिस्क्रिप्शन कफ सिरपची विक्री करणाऱ्या एकूण २३५ किरकोळ विक्रेत्यांना नोटीस बजावली असून, १९५ दुकानांचे विक्री आदेश थांबवण्यात आले

