नागपूर, दि. १२ डिसेंबर २०२५ : महिलांच्या सुरक्षिततेसाठी बस, कॅब, टॅक्सी आदी वाहनांत बसविण्यात आलेल्या पॅनिक बटण प्रणालीची राज्यभर परिणामकारता तपासून त्यातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. प्रत्येक जिल्ह्यात या प्रणालीची नियमित तपासणी करण्यात यावी, तसेच तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला.
राज्यात खासगीरित्या धावणाऱ्या टॅक्सी, कॅब आणि बसमधील आपत्कालीन बटण व्यवस्था अनेक ठिकाणी निष्क्रिय असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात संबंधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, वाहतूक पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, कॅब संघटनेचे प्रतिनिधी केशव क्षीरसागर आणि पत्रकार प्रवीण लोणकर यांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिलांच्या आपत्कालीन प्रसंगी त्वरित मदतीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष परिणाम अपेक्षित प्रमाणात दिसत नाही, असे निरीक्षण डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रणालीतील सर्व त्रुटी तातडीने दूर करणे, जनजागृती वाढविणे आणि नागरिकांना या सुविधेबाबत माहिती करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात दररोज किमान पंधरा तपासण्या करून लाईव्ह ट्रॅकिंगच्या आधारे दुरुस्तीची कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
या यंत्रणेबाबत व्यापक जनजागृती व्हावी म्हणून वाहनांत प्रणाली बसविलेल्या ठिकाणी स्पष्ट सूचना लावणे, माहितीपत्रके, जाहिराती आणि विविध माध्यमांतून प्रचार करणे गरजेचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांकही कार्यान्वित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यात एकूण एक लक्ष चाळीस हजार पाचशे नव्वद (१,४०,५९९) वाहनांमध्ये पॅनिक बटण प्रणाली बसविण्यात आली असून त्यापैकी एक लक्ष एक हजार शहाऐंशी (१,०१,०८६) वाहनांत ही प्रणाली प्रत्यक्षात कार्यरत आहे. उर्वरित वाहनांत यंत्रणा कार्यरत नसल्याचे किंवा मशिन सदोष असल्याचे आढळले आहे. दोष आढळल्यावर संबंधित वाहनचालकांना सूचना देऊन आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन आयुक्त श्री. भीमनवार यांनी दिली.
मुंबईतील कमांड अँड कंट्रोल सेंटरला आजवर पॅनिक बटण प्रणालीद्वारे सहा लक्ष तीस हजार दोनशे पंचावन्न (६,३०,२५५) अलर्ट प्राप्त झाले आहेत. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही होऊन वाहनमालकाला सूचना पाठविली जाते आणि प्रतिसाद नसल्यास ‘११२’ वर माहिती देण्यात येते. फिटनेस प्रमाणपत्रासाठी वाहनांची तपासणी होताना पॅनिक बटण प्रणाली बसविणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

