हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार आहे. विशेषत: मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर, विदर्भातील गोंदिया व नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शीतलहरीचा फटका बसल्याने सकाळ–संध्याकाळ गारठा प्रचंड वाढला असून नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. राज्यातील बहुतांश भागात दिवसा सूर्यप्रकाश दिसत असला तरी त्यात उबदारपणा कमी आहे. हवामान विभागाचा अंदाज स्पष्ट आहे, ही थंडी अजून काही काळ सोबत राहणार आहे.
मुंबई- उत्तर भारतातून येणाऱ्या तीव्र थंड वारा आता महाराष्ट्रात झंझावाती वेगाने प्रवेश करत असून, त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सातत्याने खाली येत असून गुरुवारी रात्रीही राज्यातील अनेक शहरांचा पारा 10 अंशांच्या खाली सरकला. मुंबईचे किमान तापमान 15 अंशांवर तर पर्यटकांच्या आवडीचे माथेरान 17 अंशांवर नोंदले गेले. मात्र यापेक्षा तीव्र गारठा अहिल्यानगरमध्ये जाणवला, जिथे तापमान 6.6 अंशांवर पोहोचले. पुणे व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांत पारा 7-8 अंशांदरम्यान स्थिरावला असून नागरिक अक्षरशः थरथरत आहेत. हवामान विभागाने याला पुढे आणखी तीव्रता येण्याचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगरने सलग तिसऱ्या दिवशीही राज्यातील सर्वात थंड जिल्हा म्हणून नोंद कायम ठेवली आहे. 6.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाने येथील थंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही किमान तापमान सातत्याने घसरत आहे. अनेक ठिकाणी रात्रीचा पारा नेहमीच्या सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांनी कमी नोंदला जात आहे. हवामान विभागानुसार, उत्तर भारतात तयार झालेली थंड वाऱ्यांची लाट वेगाने दक्षिणेकडे सरकत असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. पुढील दोन दिवस राज्यभर गारठा अधिक प्रखर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गारांचा स्पर्श असलेल्या या थंडीत ग्रामीण, शहरी भागात रात्रीचे जीवन जणू थांबले आहे.
अनेक ठिकाणी एक अंकी पारा
गुरुवारी नोंदलेल्या किमान तापमानाच्या आकडेवारीत राज्यातील मोठ्या भागात शीतलहरीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. अहिल्यानगर 6.6, पुणे 7.9, जळगाव 7.0, मालेगाव 8.8, नाशिक 8.2, गोंदिया 8.0, नागपूर 8.1 अशी तापमान–नोंद झाली. महाबळेश्वर 11.1 आणि सांगली 12.3 अंशांवर नोंदले गेले. सोलापूर 13.2 तर कोल्हापूर 14.4 अंशांवर स्थिरावले. वर्धा 9.9, यवतमाळ 10, परभणी 10.4, अकोला 10.0 आणि अमरावती 10.2 अंश नोंदले गेल्याने विदर्भातही गारठा तीव्र असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यातील निफामध्ये पारा थेट 6.1 अंशांवर घसरला, तर धुळे आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान 4 अंशांपर्यंत घसरण झाल्याची नोंद आहे. या परस्थितीमुळे मैदानी भागातही सर्वसामान्य नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे कमी केले आहे.
राज्यात ऑरेंज-यलो अलर्ट; ला निनो प्रभावामुळे थंडी वाढण्याची चिन्हे
राज्यातील वाढत्या थंडीमुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, वर्धा अशा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील लहरींचा वेग वाढत असल्याने पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ला निनो, या हवामान प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या सर्व भागात स्पष्टपणे दिसत असून, शेतकरी आणि सर्वसामान्यांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

