पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला बिबट्या अखेर पकडण्यात आला आहे. पुणे वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
हा बिबट्या सर्वप्रथम 28 एप्रिल 2025 रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसला होता. तेव्हापासून तो विमानतळाच्या भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी वर्दळीच्या भागांतून फिरत होता. विमानतळाचा परिसर संवेदनशील आणि विस्तृत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक ठरले होते. अनेक महिने कॅमेरा ट्रॅप, लाइव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावूनही तो सापळ्यात अडकला नव्हता.4 डिसेंबर रोजी बिबट्या पुन्हा भूमिगत बोगद्यात शिरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करून अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले. अखेर 11 डिसेंबर रोजी सुमारे 30 सदस्यांच्या पथकाने नियोजित मोहीम राबवली. बिबट्याला अंदाजे 80 फूट लांब बोगद्यात नियंत्रित करून वन्यजीव वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी अरुंद जागेतून यशस्वीपणे डार्ट केले. बिबट्याने यापूर्वी दोन लाइव्ह कॅमेरेही नष्ट केले होते, तरीही पथकाने संयमाने काम करत मोहीम फत्ते केली. पकडलेला बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर असून, पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी बावधन येथील रेस्क्यूच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी या मोहिमेचे कौतुक करत, हे “सामंजस्य आणि सतत तयारीचे उत्तम उदाहरण” असल्याचे म्हटले. रेस्क्यूच्या नेहा पंचमिया यांनी सांगितले की, प्रत्येक प्राणी बचाव मोहीम वेगळी असते आणि त्यासाठी संयम व योग्य रणनीती आवश्यक असते. या यशस्वी मोहिमेमुळे पुणे विमानतळाची सुरक्षा पुन्हा पूर्णपणे सुनिश्चित झाली असून, मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यात भारतीय यंत्रणांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

