लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झालं आहे. आज पहाटे(शुक्रवार, 12 डिसेंबर) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
राज्यासह देशाच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूरमध्ये झाला. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967-69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. 1980 मध्ये शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करण्यास सुरवात केली. 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला.
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 1991 ते 1996 या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. 2004 मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. 2004 ते 2008 या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले. 2008 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेष पाटील चाकूरकर सुन अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

