पुणे- सगळेच राजकीय पक्ष ना कोणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहणार आहेत ना कुणाचे सामाजिक दायित्व , ना कुणाचे देशप्रेम ते फक्त निवडून येण्याची क्षमता हाच एक निकष पाळून प्रभाग प्रभागात उमेदवारी देणार आहेत हे आजवरच्या अनेक निवडणुकांतून दिसून आले आहे . हेच या निवडणुकीत देखील होणार आहेच . अगदी याच पार्श्वभूमीवर गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हेगार … तोवर त्याला आम्ही करू शकतो उमेदवार अशी भूमिका आता माध्यमांतून आणि पोलीस रेकॉर्ड मधून ज्या आंदेकरांचे नाव कुख्यात गुंड म्हणून घेतले जाते त्यांच्याबाबत देखील काही पक्षांनी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचं वक्तव्य मोठे सूचक मानले जाते आहे.
पुणे : पुण्यात काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला होता. बंडू आंदेकर याने स्वत:च्या नातवाचा खून घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर जेलमध्ये आहे. तसेच त्याचे इतर कुटुंबिय देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. पण आता आगामी काळात पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जेलमध्ये असलेल्या आंदेकर कुटुंबियांनी निवडणुकीसाठी कोर्टाची परवानगी मिळवली आहे. पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने आंदेकर कुटुंबियांना निवडणूक लढण्यासाठी मंजुरी दिल्याची बातमी काल समोर आली होती. यानंतर बंडू आंदेकर वगळता त्याची भावजयी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सून तथा दिवंगत माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या दोघींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांच्या वक्तव्यावरुनच संबंधित चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “बंडू आंदेकर यांच्या व्यतिरिक्त आंदेकर कुटुंबातील इतर कोणत्या व्यक्तीने आमच्याकडे उमेदवारी मागितल्यास आम्ही त्यावर विचार करून निर्णय घेऊ”, असं सुभाष जगताप यांनी सांगितलं.
“बंडू आंदेकर यांना उमेदवारी देणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत. मात्र त्या व्यतिरिक्त आंदेकर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती उमेदवारी मागण्यास आली तर यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना उमेदवारी देणार नाही, असं ठाम सांगू शकत नाही . कारण 2017 ते 2022 या टर्ममध्ये वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी नगरसेवक म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे”, असं सुभाष जगताप म्हणाले आहेत.
“गेल्या 30 वर्षापासून आंदेकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे आपण वाचत आहोत. मात्र तसं असताना सुद्धा त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत”, असं देखील सुभाष जगताप म्हणाले आहेत.
दरम्यान, “लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बंडू आंदेकर हे निवडणूक लढणार आहेत. त्याबाबतचा अर्ज आम्ही कोर्टासमोर मांडला होता तो कोर्टाने मान्य केला आहे. कोणत्या पक्षातून आणि कुठून निवडणूक लढवायची हे आता आंदेकर ठरवणार आहे. तसेच लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या जामीनासाठी सुद्धा न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. दरम्यान आंदेकर अपक्ष लढले आणि निवडून आले तर त्यांचा पाठींबा अर्थात जे सत्तेवर येतील त्यांना मिळणार आहे असेही मानले जाते आहे.

