“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला निषेध
पुणे : लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्याच्या वतीने लोकमान्य नगरातील दत्त मंदिर चौक येथे नागरिकांनी अभूतपूर्व असा घंटानाद आंदोलन जोरदार केले. थाळ्या, घंटा, काळे झेंडे आणि काळ्या कपडे परिधान करून शेकडो नागरिक एकत्र आल्याने संपूर्ण दत्त मंदिर चौक घोषणांनी दणाणून गेला. लोकमान्यनगर पुनर्विकास प्रश्नावर अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये असंतोष वाढत असताना त्याचा उद्रेक आजच्या आंदोलनात स्पष्टपणे दिसून आला. “घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं!”, “सरकारचं करायचं काय—खाली डोकं वर पाय!”, “लोकमान्यनगरवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही!” अशा दमदार घोषणांनी वातावरण तापले होते. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी—सर्वच समाजघटकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात तीव्र रोष दर्शवला. घरकुलाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता तसेच न्याय मिळावा, अशी मुख्य मागणी नागरिकांनी केली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, अनेक वर्षे या भागात राहूनही आज पुनर्विकासाच्या नावाखाली त्यांना अनिश्चिततेत ढकलले जात आहे. घरे, हक्क, मालकी आणि भविष्यातील सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस हमी न देता निर्णय लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा आरोप केला.लोकमान्यनगर बचाव कृती समितीने चेतावणी दिली की, प्रशासनाने सकारात्मक संवाद साधून तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील काळात यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल. स्थानिक नागरिकांचा संताप आणि निर्धार पाहता या प्रश्नाची गंभीरता आणखी वाढलेल असे दिसत आहे. पुढील काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू – ऍड. गणेश सातपुते“लोकमान्यनगरच्या नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्कांवर गदा येऊ देणार नाही. सरकारने तातडीने संवाद साधून स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. नागरिकांचा संताप हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. आवश्यक असेल तर पुढील काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू.” असे ऍड. गणेश सातपुते म्हणाले.

