चंद्रपूर, दि. ११ : नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधत त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संतोष थिटे अतिरिक्त जिल्हाधिकारी, किशोर घाडगे एसडीओ, विजया झाडे तहसीलदार, आत्मज मोरे गट विकास व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी आपल्या विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. त्यावर सविस्तर चर्चा करत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शक उत्तरे दिली. लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी त्यांनी कायमच सकारात्मक निर्णय घेतले असून त्याचा लाभ महिलांना होत असल्याचेही महिलांनी व्यक्त केले.
महिलांच्या सशक्तीकरणात आर्थिक स्वावलंबन हा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत महिला बचत गटांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी प्रयत्न अधिक वेगाने राबवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
महिला सबलीकरणासाठी शासन आणि समाज यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. लाडक्या बहिणींनी शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात अधिक पुढे येणे गरजेचे असून त्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या संधींचा उपयोग करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना केले.
सध्या आचारसंहिता लागू असल्याने तिच्या समाप्तीनंतर महिला प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातील, असेही त्यांनी जाहीर केले. तसेच काही वृद्ध महिलांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
या संवाद कार्यक्रमास शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडू हजारे, महिला जिल्हाप्रमुख भारती राकडे, तालुकाप्रमुख (ब्रह्मपुरी) नरेंद्र मरड, जिल्हाप्रमुख मीनल अत्राम, तालुकाप्रमुख जालिंदर गायकवाड, विधानसभा प्रमुख नेताजी गहाणे व चंद्रपूर-गडचिरोली संपर्कप्रमुख अजय स्वामी उपस्थित होते.
लाडक्या बहिणींच्या समस्या जाणून घेऊन त्यावर संवेदनशीलतेने चर्चा करत त्यांच्या सशक्तीकरणासाठी दिलेले मार्गदर्शन महिलांसाठी आशादायी ठरले.

